Actress Death: फ्रेंच सिनेमा आणि टेलिव्हिजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बल्गेरियात जन्मलेल्या अभिनेत्री नतालिया डोंचेव्हा यांचे वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. फ्रेंच सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्या ओळखल्या जात होत्या. विशेषतः ‘डॉक मार्टिन’च्या फ्रेंच व्हर्जनमधील भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.
नतालिया डोंचेव्हा यांचा जन्म ३१ डिसेंबर १९६९ रोजी बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे झाला. त्यांचे वडील प्लामेन डॉन्चेव्ह हे देखील अभिनेते होते. अभिनयाचा वारसा लाभलेल्या नतालिया यांनी पुढे फ्रेंच मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नाट्य, चित्रपट आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी काम केले.
नतालिया यांना ‘डॉक मार्टिन’च्या फ्रेंच व्हर्जनमध्ये ज्युली डर्विल या व्यक्तिरेखेसाठी विशेष ओळखले जाते. या मालिकेत त्यांनी २०११ ते २०१५ दरम्यान भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि सहकलाकारांकडून कौतुक झाले. याशिवाय ‘प्रेमनिशन’, ‘लेडी जे’, ‘द प्रेमनिशन’, ‘द विसलर’, ‘अ मॅन अँड हिज डॉग’ आणि ‘शशिंका’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.‘शशिंका’मधील अभिनयासाठी २०१९ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या आयरिश पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांच्या कारकिर्दीत हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
नतालिया यांच्या निधनानंतर त्यांचा सावत्र मुलगा आणि चित्रपट निर्माता ह्यूगो सेलिन्याक यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिले, प्रिय नतालिया, मला 'सावत्र आई' हे संबोधन कधीच आवडले नाही. कारण आपण जेव्हा भेटलो, तेव्हा मी काही लहान मूल नव्हतो. मला यापूर्वीही एक सावत्र आई होतीच. पण तू किती सुंदर मनाची व्यक्ती होतीस आणि तू जशी होतीस तशीच मी तुझ्यावर तसंच मनापासून प्रेम करायचो याची तुला कदाचित कधीच पूर्ण कल्पना नसेल. आपल्या कुटुंबातील नातेसंबंध जपण्यासाठी तू जी अथक धडपड केलीस, त्याबद्दल तुझे आभार. माझ्या तरुणपणापासून माझ्याकडे नेहमीच अभिमानाने पाहून तू मला जो आत्मविश्वास दिलास, त्याबद्दल तुझे आभार. जॉर्जियाची काळजी घेतल्याबद्दल तुझे आभार. माझ्या मुलांना अगदी स्वतःच्या मुलांसारखेच प्रेम देऊन त्यांचा स्वीकार केल्याबद्दल तुझे आभार. आपल्या वडिलांना एक अधिक चांगला माणूस बनण्यास मदत केल्याबद्दल तुझे आभार. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २५ वर्षे त्यांची काळजी घेतल्याबद्दल तुझे आभार. त्यांचा आदर केल्याबद्दल, कठीण प्रसंगांत त्यांना सावरल्याबद्दल, त्यांना साथ दिल्याबद्दल, त्यांना माफ केल्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यावर मनापासून प्रेम केल्याबद्दल तुझे आभार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.