
Ground Zero Teaser: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ग्राउंड झिरो’चा टीझर गुरुवारी प्रदर्शित झाला. ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि यात इमरान एका धाडसी मिशन पूर्ण करताना दिसणार आहे. त्याचबरोबर, या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि झोया हुसेन यांच्यासह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
टीझरची खासियत
‘ग्राउंड झिरो’च्या टीझरची सुरुवात काश्मीरच्या पार्श्वभूमीवर होते, जिथे इमरान हाश्मी बीएसएफ उप कमांडंट नरेंद्र नाथ धर दुबे या खऱ्या आयुष्यातील नायकाच्या भूमिकेत दिसतो. या टीझरमध्ये एका गुप्त मिशनची झलक दाखवण्यात आली आहे. या मिशनमुळे काश्मीरमधील परिस्थिती बदलली होती. टीझरमध्ये इमरानचा दमदार अभिनय आणि अॅक्शन सीन पाहायला मिळतात. त्याचबरोबर एका संवादात तो विचारतो, "सिर्फ जमीन हमारी है या लोग भी?" हा प्रश्न चित्रपटाच्या कथेची भावनिकता दर्शवतो. टीझरमध्ये सई ताम्हणकर आणि झोया हुसेन यांच्या व्यक्तिरेखांचीही झलक दिसते, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
सत्य घटनेवर आधारित कथा
‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट बीएसएफचे सेकेंड कमांडंट नरेंद्र नाथ धर दुबे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी २००३ मध्ये दहशतवादी सरगना गाजी बाबाला ठार करण्याच्या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते. या कामगिरीसाठी त्यांना २००५ मध्ये राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले होते. हा चित्रपट त्यांच्या शौर्य आणि बलिदानाची कहाणी मोठ्या पडद्यावर आणणार आहे.
प्रदर्शनाची तारीख
तेजस प्रभा विजय देवस्कर दिग्दर्शित ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याचित्रपटात इमरान हाश्मीसोबत सई ताम्हणकर, झोया हुसेन आणि मुकेश तिवारी यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा काश्मीरमधील संघर्ष आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर केंद्रित आहे. या चित्रपटाचा टीझर सलमान खानच्या ‘सिकंदर’ सोबत जोडल्याने या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.