Eetha Controversy: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'ईठा' या आगामी चित्रपटावर वाद निर्माण झाला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐतिहासिक सत्याशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाई नारायणगावकर यांचे नातू धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषद घेत चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप करत अनेक मागण्या मांडल्या.
धनंजय खुडे यांनी सांगितले की, विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्याशी संबंधित चित्रपट तयार करताना त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा होणे आणि ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करणे आवश्यक होते. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कुटुंबीयांची कोणतीही परवानगी किंवा संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या मते, चित्रपटाच्या टीझरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनातील काही घटनांचे चुकीचे चित्रण करण्यात आले त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि इतिहासाचा विपर्यास होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक सत्य बदलून दाखविणे हे केवळ कुटुंबीयांच्या भावना दुखावणारे नसून लोककलेच्या इतिहासालाही धक्का देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यावरही टीका केली. विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर चित्रपट बनवताना संपूर्ण कुटुंबीयांची संमती घेणे आवश्यक होते, मात्र तसे करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चित्रपटातील वादग्रस्त बाबींचा फेरविचार करून ऐतिहासिक तथ्यांनुसार आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, चित्रपटात आवश्यक बदल करण्यात आले नाहीत, तर चित्रपट निर्माते आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यासोबतच राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा कुटुंबीयांनी दिल्याने 'ईठा' चित्रपटावरील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.