Dhanush : दक्षिण भारतातील सुपरस्टार धनुषचा आगामी हिंदी चित्रपट 'तेरे इश्क में'च्या सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत धनुष भारतीय वायुसेनेच्या गणवेशात, लहान केस आणि स्टाईलिश मिशांसह दिसत आहे, यामुळे त्याचा लूक पूर्णपणे बदललेला दिसतो. कॉलेज बॉयसारखा मस्तमौला लुक जिथे त्याची ओळख होती, त्याच्या पूर्णपणे विरुध्द असलेल्या हा गंभीर लूक त्याच्या भूमिकेतील महत्त्वपूर्ण बदल दर्शवतो.
'रांझणा' या चित्रपटानंतर सुमारे १२ वर्षांनी धनुष पुन्हा एकदा दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासोबत काम करत आहे. या नवीन चित्रपटात त्याची भूमिका अधिक भावनिक असल्याचे संकेत मिळत आहेत. चित्रपटाच्या कथानकाबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु आतल्या सूत्रांच्या मते, ही भूमिका धनुषच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक ठरू शकते.
'तेरे इश्क में' या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करत असून, हिमांशु शर्मा यांनी पटकथा लिहिली आहे. गुलशन कुमार, टी-सीरीज आणि कलर येलो यांच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात धनुषसोबत क्रीती सॅनन मुख्य भूमिकेत आहे. संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
धनुषचा वायुसेनेच्या गणवेशातील लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. त्याच्या या नव्या भूमिकेतील लूकने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाच्या कथानकाबद्दल अधिक माहिती मिळण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Written By : Mrunmayi Samel