Chiranjiv Perfect Bighadlay: गेल्या दोन वर्षांपासून एकांकिका स्पर्धांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्याचा ऊर्जावान ग्रुप आता व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. त्यांच्या अत्यंत चर्चेत राहिलेल्या आणि पुरस्कारांची लयलूट करणाऱ्या एकांकिकेवर आधारित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे पूर्ण लांबीचं नाटक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी, मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर रंगमंचावर सादर होणार आहे.
ही एकांकिका यावर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सर्व पारितोषिकं पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतली होती. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशा सर्वच अंगांवर नव्या दृष्टीकोनातून केलेले प्रयोग या कलाकृतीचं वैशिष्ट्य ठरले होते.
या नाटकाचं सादरीकरण सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी करणार असून निर्मितीची जबाबदारी ‘जिगीषा’ संस्थेने घेतली आहे. विशेष म्हणजे, मूळ एकांकिकेतीलच कलावंत या नाटकात झळकणार आहेत. सध्या तालमी जोरात सुरू असून, या नाटकाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
लेखन आणि दिग्दर्शनाची दुहेरी जबाबदारी विनोद रत्ना यांनी सांभाळली असून, प्रमुख भूमिकांमध्ये समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे दिसणार आहेत. एकांकिका, दीर्घांक आणि राज्यनाट्य स्पर्धांमधून व्यावसायिक रंगभूमीवर पोहोचण्याचा हा प्रवास महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नवा नाही. पूर्वी ‘ऑल दि बेस्ट’ आणि ‘मनोमिलन’ सारख्या प्रयोगांनी असे यश मिळवले होते, आणि आता ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकाने त्याच वाटेवर नव्या पिढीचा झंकार आणला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.