
Chhaava Movie : छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'छावा चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे. जाणीवपूर्वक इतिहास बदलला आहे. आमच्या घराण्याला बदनाम केले जात आहे, असे शिर्के यांचे वंशज दीपक राजेशिर्के यांनी म्हटले होते. या प्रकरणावरुन छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के यांची जाहीर माफी मागितली आहे.
शिर्केचे वंशज दीपक राजेशिर्के यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप व्यक्त केला होता. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये 'गणोजी राजे शिर्के यांनी औंरगजेबाच्या सैन्याला वाट दाखवली नाही. याबाबत कोणताही पुरावा नाही. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत मग हे आरोप कसे केले जातात' असे वक्तव्य केले होते.
दरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि शिर्के यांच्या वंशज यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यात लक्ष्मण उतेकर यांनी 'तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. सिनेमाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर येतो, हा चित्रपट पूर्णत छावा कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाची कथा, पटकथा छावामध्ये जसं लिहिलंय तसं रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी आणि चित्रपटात सारखीच माहिती आहे. मी लेखक किंवा दिग्दर्शन म्हणून त्यात बदल केला नाही' असे म्हटले आहे.
'छावामध्ये गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के, शिरकाण गावचे, त्याचं कुलदैवत कोणतं. हे सर्वकाही छावामध्ये आहे. हे पुस्तक आताही बाजारात उपलब्ध आहे. महाराजांवर मालिका आली होती. त्यातही नावाचा उल्लेख केला आहे. या चित्रपटात आम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. 'गणोजी' आणि 'कान्होजी' असा उल्लेख आहे. त्यांचं आडनाव काय आहे हे अजिबात दाखवलं नाही. ही खबरदारी आम्ही घेतली आहे. कारण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या.' असे लक्ष्मण उतेकर म्हणाले.
'पैसे कमावण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला नाही. चार वर्ष मेहनत करुन आम्ही छावा बनवला आहे. फक्त छत्रपती संभाजी महाराज काय होते हे जगाला कळावं यासाठी आम्ही चित्रपट बनवला आहे. तुमचं मन दुखवलं असेल तर त्याची मी माफी मागतो. पण छावा चित्रपटात कुठेही शिर्के या नावाचा उल्लेख केलेला नाही', असे छावाचे दिग्दर्शक म्हणाले आहेत.
'चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुहास राजेशिर्के यांनी नोटीस पाठवली होती. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सात दिवस आधी नोटीस पाठवण्यात आली होती. चित्रपटात काही आक्षेपार्ह दाखवण्यात आले नाही ना यासाठी आम्हाला चित्रपट दाखवा अशी नोटीस पाठवली होती. त्यावेळेस तुम्ही प्रतिक्रिया का दिली नाही, असे शिर्के यांच्या वंशजांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.