बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पूनम पांडेचा (Poonam Pandey) मृत्यू झाल्याच्या बातमीने दोन दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. शुक्रवारी पूनम पांडेचा गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तिच्या निधनामुळे चाहत्यांसह बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. पूनमचा मृत्यू झाल्याबाबत अनेकांनी विश्वास ठेवला नाही. ही फेक न्यूज असल्याचे देखील अनेकांनी म्हटलं. अखेर त्यांचे म्हणणे खरं ठरलं आहे.
पूनम पांडेने रविवारी एक व्हिडीओ पोस्ट करत आपण जिवंत (Poonam Pandey Alive) असल्याचे सांगितले. यावेळी तिने चाहते आणि फॉलोअर्सची माफी देखील मागितली. पूनम पांडेने असं का केलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिला सध्या ट्रोल केले जात असून तिच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. हे प्रकरण पूनम पांडेला चांगलेच भोवणार आहे कारण या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे पूनम पांडेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वकील अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई पोलिसात पूनम पांडेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अभिनेत्रीची मॅनेजर निकिता शर्मा आणि एजन्सी हॉटरफ्लाय यांच्याविरोधामध्ये आयपीसी कलम 417, 420, 120 बी, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या नावाखाली जनतेची आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप पूनमवर करण्यात आला आहे.
पूनम पांडेने रविवारी व्हिडीओ शेअर करत आपण जीवंत असल्याचे सांगितले. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितले की, 'तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे.'
दरम्यान, पूनम पांडेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पूनम पांडे जीवंत असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना आनंद झाला. पण तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशापद्धतीने जनतेची फसवणूक करणं आणि लोकांच्या भावनांशी खेळणं चूकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पूनम पांडेच्या अनेक मित्रांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील यावर मत व्यक्त करत पूनम पांडे चूकीचे वागली असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.