मराठी सिनेमा देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत. तसेच बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई करत आहेत. हिंदीतील कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पाहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम हिचा देखील समावेश आहे. एलीने बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच नाव कमावले आहे. 'इलू इलू' (Ilu Ilu Movie) या मराठी चित्रपटाच्या माध्यमतून ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
फाळके फिल्म्स एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित 'इलू इलू' ही एक मनोरंजक लव्हस्टोरी आहे. इलू इलू' चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील 'इलू इलू' या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने चाहत्यांची मने जिंकली.
एली अवरामने ( Elli Avram) २०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटातून हिंदी चित्रपटात पदार्पण केले. आजवर तिने किस किस को प्यार करूं, नाम शबाना, पोस्टर बॅाईज, बाझार, मलंग, कोई जाने ना, गुडबाय अशा असंख्य चित्रपटात काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही उत्तम अभिनय केला आहे. 'इलू इलू' या मराठी चित्रपटात एली 'मिस पिंटो' च्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीने खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिने मोठ्या आत्मविश्वासाने साकारली आहे.
मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, "मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर 'इलू इलू' च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मला मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळे आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडे दडपण जाणवले होते. पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एन्ट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्याने मी चित्रपटाला होकार दिला. "
'इलू इलू' या चित्रपटात वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत इत्यादी कलाकार आहेत. जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणार आहेत. मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. 'इलू इलू' चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'इलू इलू' चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत. 'इलू इलू' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.