Avatar 3 First Look: जेम्स कॅमेरॉन यांच्या बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड अॅश' या चित्रपटाची पुढील कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या खलनायक 'वरंग'ची पहिली झलक 'अवतार ३' मधून दाखवण्यात आली आहे. निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे देखील जाहीर केले आहे. या चित्रपटाचे बजेट २५ कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २१,५६,२८,५८,७५० भारतीय रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
'अवतार' फ्रँचायझीचा नवीन भाग या वर्षी १९ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक्ता निर्माण झाली आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये खलनायक वरंगचा चेहरा आहे. हे पात्र उना चॅप्लिन साकारत आहे. वरंगला मांगकवान कुळाचा किंवा अॅश पीपलचा नेता म्हटले जात आहे. नावी ज्वालामुखीजवळील अग्निमय भागात राहतात, जे पेंडोराच्या वातावरणात नवीन आहेत.
'अवतार ३' चा ट्रेलर कधी येणार?
निर्मात्यांनी पहिल्या पोस्टरसोबत चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे देखील सांगितले आहे. पोस्टर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'अवतार: फायर अँड अॅशमधील वरंगला भेटा. या आठवड्याच्या शेवटी थिएटरमध्ये 'द फॅन्टास्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स' सह ट्रेलर पाहणाऱ्यांपैकी एक व्हा.' २५ जुलै २०२५ रोजी या चित्रपटाच्या रिलीजसह ट्रेलर लाँच केला जाईल.
'न्यू यॉर्क टाईम्स'मधील वृत्तानुसार, 'अवतार ३' चा ट्रेलर अलीकडेच डिस्नेच्या लॉस एंजेलिस आणि न्यू यॉर्क कार्यालयात दाखवण्यात आला. यामध्ये, खलनायक वरंग लाल आणि काळ्या रंगाचा मुकुट घातलेला दाखवण्यात आला आहे.