मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) शनिवारी लाडक्या गणपती बाप्पाला आपल्या परिवारासोबत वाजतगाजत निरोप दिला. याचा एक व्हिडिओ शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने (Raj Kundra) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हॅशटॅगसह मीडिया, सत्य आणि ट्रायल असे शब्द लिहिले आहेत. राज कुंद्राला गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. तपासानंतर त्याला गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणावर आधारित राजने जवळपास वर्षभरानंतर ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज कुंद्राने त्याच्या घरी झालेल्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि तिची आई देखील गणपती विसर्जन करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना राजने लिहिले की, 'तुम्ही जे पाहता ते केवळ तुम्ही काय पाहता यावर अवलंबून नाही, तर तुम्ही कुठून पाहता यावरही अवलंबून असते.'
राज कुंद्राने आपल्या ट्विटमध्ये मीडिया, ट्रायल, पीस, पॅशन, बाप्पा मोरया, सत्य अशा हॅशटॅगचा वापर केला आहे. हा ४५ सेकंदाचा व्हिडिओ उंचावरून शूट करण्यात आला आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राजचे नाव मुख्य आरोपी म्हणून होते आणि त्याला गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये अटक करण्यात आली होती. तो दोन महिने तुरुंगात राहिला पण नंतर त्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
राज कुंद्राला जामीन मंजूर करताना न्यायालयाने असा युक्तिवाद केला की, 'खटला बराच काळ चालणार असल्याने आरोपीला इतके दिवस बंधिस्त ठेवणे अयोग्य आहे. राज कुंद्राचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन पोलीसांच्या ताब्यात असल्याने तो पुराव्याशी छेडछाड करू शकत नाही', म्हणूनच न्यायालयाने राज कुंद्राची जामिनावर सुटका केली.
जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्रा प्रसार माध्यमांपासून लांब आहे. या पोर्नोग्राफी प्रकरणावर राजने अद्याप जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच शिल्पानेही या प्रकरणावर भाष्य करणे टाळले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.