स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. यंदाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन अवघा देश मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात साजरा करणार आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
शूरवीरांचा वारसा या भारतभूमीला लाभलेला आहे. आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण आज सुरक्षित आहोत. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची देशसेवा यांच्यावर ‘फौजी’ चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत.
आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मीती केल्याचे चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे यांनी सांगितले.
‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती घनशाम येडे यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा, तर संकलन विश्वजीत यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत.
संगीत राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार तर पार्श्ववसंगीत उमेश रावराणे, सूरज कुमार यांचे आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे.
ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्सने सांभाळली आहे. ‘फौजी’ मराठी चित्रपट ३० ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.