

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) या चित्रपटातून तब्बल चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतला आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट १३ वर्षांतील सर्वात कमी ओपनिंगचा चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' या फ्लॉप चित्रपटापेक्षाही आमिर खानच्या या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन तुलनेने खूपच कमी झाले आहे. ही बातमी आमिर खानसाठी नक्कीच चांगली नाही, असे म्हणावे लागेल.
'लाल सिंग चड्ढा'चे अॅडव्हान्स बुकिंग बघता या चित्रपटाची ओपनिंग निराशाजनक होईल, असे संकेत मिळत होते. तसेच समीक्षकांनीही आधीच कमी ओपनिंगचा अंदाज वर्तवला होता. चित्रपटाने मोठ्या शहरांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु छोट्या शहरांमध्ये त्याचे कलेक्शन खूपच कमी झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशभरातील ३५०० स्क्रीनवर रीलीज झालेल्या 'लाल सिंग चड्ढा'ने पहिल्याच दिवशी ११.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यापैकी सुमारे ६ कोटींची कमाई पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस सारख्या मोठ्या सिनेमा थिएटर्समधून तर, उर्वरित कमाई सिंगल थिएटर्स आणि इतर मल्टिप्लेक्समधून झाली आहे.
११ ऑगस्टला सकाळी 'लाल सिंग चड्ढा' ९ कोटींच्या आसपासच कमाई करेल, असे वाटत होते. पण मल्टिप्लेक्समधील संध्याकाळच्या शोने चित्रपटाचा कमाईमध्ये थोडी भर घातली. अत्यंत कमी प्रतिसाद असतानाही हा चित्रपट १५ कोटींचा व्यवसाय करेल, अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही.
या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटानेही पहिल्या दिवशी १३.२५ कोटींची कमाई केली होती. दिग्दर्शक कबीर खानच्या ८३ या चित्रपटाने देखील १२.६४ कोटींची ओपनिंग केली होती. यावरून अंदाज लावला जात आहे की आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.