अभिनेत्री, नृत्यागंणा, निर्माती आणि बिझनेसवूमन प्राजक्ता माळीचा फुलवंती हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील प्राजक्ताच्या भूमिकेने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे. अनेक सेलिब्रिटी देखील प्राजक्ताच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेचे कौतुक करताना दिसत आहेत. अशातच प्राजक्ताची जवळची मैत्रिणी राधिका देशपांडे खास पोस्ट शेअर केली आहे.
राधिकाने तिच्या पोस्टमध्ये, "मदन मंजिरी, सुबक ठेंगणी, चटक चांदणी प्राजक्ता लखलखते आहे सोनेरी पडद्यावर. “तुम्ही जरा बघा तरी” असं म्हणत प्राजक्ताचा तोरा लक्ष वेधून घेतो, आकृष्ट करून घेतो. प्राजक्ता तुझ्यासाठी म्हणून मी हा चित्रपट बघायला गेले. अर्थात इतरही कारणं होतीच. भट्टी जमून आलेल्या, पंचतारांकित अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ असलेला चित्रपट हुकवायचा म्हणजे प्रेक्षकांचे नुकसानच."
पुढे तिने,"मला माझ्या वॉल वर खास करून तुझ्यावर लिहावं वाटलं म्हणून हा लेख. साधारण १२ वर्ष झाली. तुझाही एक तप पूर्ण झाला असेल. एका ऑडिशनला तू पण आली होतीस. एकदम साधी, नो attitude असलेली तू मला तेंव्हाच आवडली. मी पण त्याच serial मधे काम केलं होतं, “सुवासिनी”. पण माझा रोल संपला आणि तुझी एंट्री झाली, त्यामुळे आपण एकत्र काम केलं नाही. तू माझ्या नणदे बरोबर नृत्यात MA केलं असल्याचं कळलं. “रोटी दो” ह्या समाज कार्यासाठी आपण एक व्हिडिओ केला, तेंव्हा तू भेटलीस आणि आपल्या गप्पा झाल्या.
मग तुझी प्रगती बघत आले आहे मी आणि टप्प्याटप्प्याने आपलं मेसेज वर बोलणं होत आलं आहे. मला तेंव्हाही तुझं कौतुक वाटे आणि आजही आहे. हिच्यात काहीतरी आहे. वेगळीच आग आहे हिच्यात. पण तू तेवढीच शांत ही आहेस, देवा पुढे लावलेल्या समयी प्रमाणे. तुझा आज ‘प्राजक्तराज‘ हा ब्रँड पॉप्युलर आहे. तू आता निर्माती ही आहेस. ‘फूलवंती‘ तर तू आधीपासूनच आहेस. त्याची इच्छापूर्ती आत्ता झाली असं मी म्हणेन. एवढं सगळं असणं सोप्पं नाही गं! सोप्पा नसेलच तुझा हा एकटीच प्रवास. सोबत असतात सगळे पण तू तुझी नाव चंदेरी समुद्रात सोडल्यावर, आडव्या तिडव्या लाटांमधून सरकवत, ओढत, ढकलत नेलीस. प्रत्येक लाटेला जणू टाळी देत पुढे जात राहिलीस."
टीकाकार टीका करतील, अगदी ह्या लेखाची सुद्धा. इंडस्ट्रीतल्या समकालीन नटीबद्दल लिहिते आहे म्हंटल्यावर काहींना ‘माझा काय स्वार्थ असेल‘ असं ही वाटून जाईल. पण तुझ्या आणि माझ्यात एक समान दुवा आहे. आपण दोघीही गुरुबंधू. श्री श्री रविशंकर ह्यांच्या शिष्या.
चित्रपट देखणा आहे. मांडणी सुंदर आहे. प्राजक्ता, तू खूप सुंदर दिसली आहेस. प्रेक्षक जाणारच तुला पाहायला. प्राजक्ताच्या फुलाचं एक वैशिष्ट्य असतं. ते कोमेजून जरी गेले तरी त्यांचा सुगंध दरवळत राहतो. मतितार्थ असा की चित्रपट प्रेक्षागृहातच जाऊन बघा कारण त्यानंतर सुगंध मिळेलच पण फूल हातात पडण्याची मजा, ती कशी मिळवाल? मैत्रिणी तुझा हा चित्रपटात घरंदाज ‘साज‘ आहे. अनेक उत्तम शुभेच्छा. जय गुरुदेव!"
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.