छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली . पोलिसांनी ३१ जुलैला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. मात्र, या गुन्ह्याची माहिती शहर पोलिसांनी जाणीवपूर्वक लपवली, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गणेश संपत म्हस्के (वय ३०) असे आरोपी चालकाचे नाव असून, तो या मुलीला गेली तीन वर्षे व्हॅनमधून शाळेत आणण्या-नेण्याचे काम करत होता. ३० जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास इतर विद्यार्थी व्हॅनमधून उतरले, त्यानंतर काही अंतरावर वाहन थांबवून गणेशने पीडित मुलीचा हात पकडत अश्लील स्वरूपाची बोलणी केली. “तू खूप क्युट आहेस, आपण दोघं उद्या फिरायला जाऊ,” असे म्हणत तिला तिच्या पालकांना सांगण्यास सांगितले की, “शाळेतून यायला उशीर होईल.” या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेली पीडित मुलगी घरी गेल्यावर तिने सायंकाळी आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेवर ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तथापि, इतका गंभीर प्रकार घडूनही शहर पोलिसांनी हा गुन्हा प्रसारमाध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आता जोर धरतोय. शाळेशी संबंधित बाबींना संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी माहिती दडपली का, असा प्रश्न आता समाजात विचारला जात आहे.
शहरात शाळा व्हॅन चालकांवरील देखरेखीचा अभाव आणि सुरक्षा यंत्रणांची निष्काळजीपणा यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. या घटनेने पालकांच्या विश्वासाला तडा गेला असून, शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक तीव्र लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.