सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : बदलापूर आणि दौंडमधील शाळेतील मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुळशी तालुक्यातील आनंदगाव येथील शाळेत शिक्षकाने लज्जास्पद प्रकार केला आहे. आनंदगाव शाळेतील शिक्षकाने तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळेच्या संस्थाचालकांनी संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. जालिंदर असे नराधम शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदगावातील नामांकित शाळेतील उपशिक्षक जालिंदर हा विद्यार्थिनींना शारिरीक मारहाण आणि शिकवताना अश्लिल भाषेत बोलायचा. विद्यार्थिनींशी शारीरिक लगट करायचा, या तक्रारीनंतर पाच सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकरणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्यावेळी १९ विद्यार्थिनींनी समितीच्या सदस्यांना संबंधित शिक्षकाविषयी लेखी तक्रार दिली.
विद्यार्थिनींनी तक्रारीत म्हटले की, शिक्षक जालिंदर हा शिकवताना विनाकारण फळ्यावर मुका, किस, पप्पी असे शब्द लिहतो. तसेच शिकवताना मामाने मामीला मळ्यात मिठी मारली, असे वाक्यप्रचार करतो, असे विद्यार्थिनींनी तक्रारीत म्हटले.
विद्यार्थिनींनी तक्रार अर्जात पुढे म्हटलं, जालिंदर याने शाळेत खेळणाऱ्या एका मुलीच्या डोळ्याला पट्टीबांधत तिला मिठी मारली. इतर विद्यार्थी ओरडल्यानंतर शिक्षकाने सोडले. जालंदर हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जावून कानामध्ये बोलायचा आणि मोठ्याने कानात ओरडायचा. तसेच हाताला स्पर्श करायचा. त्यानंतर डोक्यावर डोके आपटत असे. विरोध केल्यानंतरही मारहाण करायचा. जालंदर हा वर्गामध्ये अश्लील कविता करायचा. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचा, असे तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, 2024 मध्ये जून महिन्यात शाळा सुरु झाल्यापासून जालिंदर हा शाळेतील विद्यार्थिनींना शारिरीक मारहाण आणि शिकविताना अश्लील भाषेत बोलणे, तसेच शारीरिक लगट करणे, अशा प्रकारचे कृत्य करत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींनी मनात लज्जा उत्पन्न होते म्हणून संस्थेच्या कार्यकिरणी समितीकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार संस्थाचालकांनी शिक्षकाविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.