भिवंडी तालुक्यातील काल्हरे येथे तरुणांच्या एका गटाने खाडीकिनारी भांडण मिटवण्याच्या बहान्याने अल्पवयीन मुलाला बोलावू घेतलं आणि हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. दरम्यान याप्रकरणी नारपोली पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल, आयुष झा, मनोज टोपे अशी संशयित आरोपींची नावे असून यात आणखी काही जण सामिल असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी काल्हेर येथे राहणाऱ्या 16 वर्षांच्या योगेश रवी शर्माला आरोपींनी मोबाईलवरून काल्हेर खाडी किनारी बोलावून घेतलं. त्यांनंतर त्याची चाकू व कोयत्याने वार करून हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तेथील निर्जनस्थळी आगोदरच खड्डा खोदून ठेवलेल्या ठिकाणी योगेशचा मृतदेह आरोपींनी पुरला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास करीत असताना काही संशयितांची नावे समोर आली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर कामतघर भागात राहणाऱ्या आयुष झा, मनोज टोपे यांना तब्बल बारा दिवसां नंतर ताब्यात घेण्यात आले. त्यांनी चौकशीत हत्येची कबुली देत मृतदेह ज्या ठिकाणी पुरून ठेवला होता ती जागा दाखवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेच्या मूळापर्यंत जाण्याचा पर्यत्न केला. दरम्यान अधिक तपास केला असता कामतघर येथील ब्रह्मानंदनगरमध्ये सहा महिन्यांपूर्वी हत्या करणाऱ्या युवकांसोबत हत्या झालेल्या युवकाच्या गटासोबत हाणामारी झाल्याची माहिती समोर आली. या हाणामारीचा राग मनात ठेऊन हत्या करण्याचा कट रचून योगेशला भांडण मिटवण्याच्या बहान्याने बोलावून घेतले आणि त्यांची हत्या केली.
त्यानंतर नारपोली पोलिसांनी आपोपींना पकडण्यासाठी दोन पथक बनवून फरार अन्य तिघांचा शोध सुरू केला. दरम्यान आज अनिकेत तुकाराम खरात,शिवाजी धनराज माने,संतोष सत्यनारायण ताटीपामुल या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. हत्येच्या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. याप्रकरणात अजून काही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर हत्या झालेला योगेश हा समाज माध्यमांवर उज्जैन येथील प्रसिद्ध दुर्लभ कश्यपचा फॉलोअर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.