Maruti Suzuki: ५०० किमीची रेंज! कार आहे की बुलेट ट्रेन; मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV कधी होणार लाँच?

EV Revolution: पेट्रोल-डिझेल खर्च वाचवण्यासाठी लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या मागणीला प्रतिसाद देत, मारुती सुझुकी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे, जाणून घ्या विशेष माहिती.
Maruti Suzuki: ५०० किमीची रेंज! कार आहे की बुलेट ट्रेन; मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV कधी होणार लाँच?
Published On

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत असताना, देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या लाँचसाठी सज्ज झाली आहे. कंपनीने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे अनावरण केले होते. ज्याला ई-विटारा असे नाव देण्यात आले आहे. ही कार डिसेंबर २०२५ मध्ये शोरूममध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, ग्राहकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील हंसलपूर येथील मारुती सुझुकीच्या उत्पादन प्रकल्पात ई-विटाराला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर ही कार देशभरात चर्चेचा विषय ठरली. ऑगस्ट महिन्यात या कारचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले असून, एसएमसीच्या गुजरात प्लांटमधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६,००० हून अधिक युनिट्स पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी २,९०० पेक्षा जास्त युनिट्स गुजरातमधील पिपावाव बंदरातून यूके, जर्मनी, नॉर्वे, फ्रान्ससह १२ युरोपीय देशांना पाठवण्यात आल्या आहेत. मेड इन इंडिया ई-विटारा जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.

कंपनीच्या अलीकडेच लाँच झालेल्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही 'व्हिक्टोरिस' ला काही आठवड्यांत २५,००० पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्यानंतर, मारुतीने आपले पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणण्याची तयारी केली आहे. ई-विटारा कंपनीच्या प्रीमियम नेक्सा डीलरशिपमधून विकली जाणार असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१७ लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

या इलेक्ट्रिक कारमध्ये BYD कंपनीकडून मिळवलेले दोन LFP बॅटरी पॅक असतील. एक बॅटरी पॅक ४८.८ kWh क्षमतेचा असेल तर दुसरा ६१.१ kWh क्षमतेचा असेल. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार ५०० किमी पेक्षा जास्त अंतर पार करू शकते. ई-विटारा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल – डेल्टा, झेटा आणि अल्फा. हार्टेक्ट ई आर्किटेक्चरवर आधारित असलेली ही कार उच्च स्तरावरील सुरक्षिततेवर केंद्रित असेल. लहान बॅटरी पॅक १४४ पीएस पॉवर आणि १९२.५ एनएम टॉर्क देईल, तर मोठा बॅटरी पॅक १७४ पीएस पॉवर आणि तेवढ्याच टॉर्कसह येईल. डीसी फास्ट चार्जिंगच्या मदतीने बॅटरी फक्त ५० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होईल.

ई-विटारामध्ये १०.२५-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १०.१-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, १०-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, लेव्हल २ एडीएएस, सात एअरबॅग्ज आणि ३६०-डिग्री कॅमेरा अशा अत्याधुनिक फीचर्सचा समावेश असेल. ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, टाटा कर्व्ह ईव्ही, टाटा हॅरियर ईव्ही, महिंद्रा एक्सईव्ही ९ई आणि एमजी झेडएस ईव्ही सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी थेट स्पर्धा करेल.

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचा वेग वाढत असताना, मारुती सुझुकीची ई-विटारा ही कंपनीसाठीच नव्हे तर भारतीय ऑटोमोबाइल उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहण्याऐवजी दीर्घ पल्ल्याची, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पर्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com