GST Reforms: ८ दिवसांत ४,००,००० वाहनांची विक्री, GST कपातीमुळे कार आणि दुचाकी विक्रीत जबरदस्त वाढ

Vehicle Sales: सप्टेंबरमध्ये कार विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली. जीएसटी कपातीमुळे कारच्या किमती कमी झाल्या असून, यामुळे ऑटोमोबाईल उद्योगाला नवचैतन्य मिळाले आहे.
GST Reforms: ८ दिवसांत ४,००,००० वाहनांची विक्री, GST कपातीमुळे कार आणि दुचाकी विक्रीत जबरदस्त वाढ
Published On

जीएसटी कपातीनंतर देशातील वाहन विक्रीत सप्टेंबर महिन्यात मोठी वाढ झाली. उद्योग क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते, ही वाढ चार लाखांच्या पुढे गेली असून, यामध्ये कर कपातीसह सणासुदीचे वातावरण, आकर्षक ऑफर्स आणि ग्राहकांचा वाढलेला प्रतिसाद या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. सरकारने २२ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नवीन जीएसटी दरांमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या आणि ग्राहकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतला. नवरात्रोत्सवाच्या काळात विक्रीला अनपेक्षित वेग आला आणि किरकोळ विक्रीत तब्बल २५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

मारुती सुझुकी

सप्टेंबरमध्ये वाहन कंपन्यांची विक्री आकडेवारीही उल्लेखनीय आहे. आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने नवरात्रीच्या पहिल्या आठ दिवसांतच १,६५,००० वाहने विकल्याचे सांगितले असून, अखेरीस ही संख्या दोन लाखांच्या घरात जाईल अशी अपेक्षा आहे. कंपनीकडे आधीच साडे-दोन लाख वाहनांच्या प्रलंबित ऑर्डर्स आहेत आणि रोज १८,००० हून अधिक नवीन बुकिंग होत आहेत. अशा वेगवान मागणीमुळे मारुती या नवरात्राला गेल्या दशकातील सर्वोत्तम म्हणत आहे.

हुंडई मोटर

हुंडई मोटर इंडियाने देखील मजबूत कामगिरी केली आहे. कंपनीची एकूण विक्री १० टक्क्यांनी वाढून ७०,३४७ युनिट्सवर पोहोचली असून, यातील देशांतर्गत विक्री ५१,५४७ युनिट्स आहे. कंपनीचे सीईओ तरुण गर्ग यांनी सांगितले की, GST 2.0 सुधारणा लागू झाल्यानंतर केवळ देशांतर्गतच नव्हे तर निर्यातीतही चांगली वाढ दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हुंडईच्या SUV विक्रीत तब्बल ७२ टक्क्यांची वाढ झाली असून ती कंपनीसाठी विक्रमी ठरली आहे.

टाटा मोटर्स

दरम्यान, टाटा मोटर्सने मोठी झेप घेतली असून, सप्टेंबर महिन्यात कंपनीने एकूण ५९,६६७ युनिट्स विक्री करून आपला विक्रम प्रस्थापित केला. मागील वर्षाच्या तुलनेत टाटाच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४५ टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली. टाटाने यावेळी प्रतिस्पर्धी महिंद्रा अँड महिंद्रा तसेच हुंडई मोटर इंडियालाही मागे टाकले. महिंद्राने देखील समाधानकारक कामगिरी केली असून त्यांच्या विक्रीत १० टक्क्यांची वाढ नोंदली गेली आणि ती एकूण ५६,२३३ युनिट्सवर पोहोचली.

दुचाकी वाहनांची मागणी

दुचाकी बाजारातही मागणी प्रबळ राहिली. टीव्हीएस मोटर कंपनीची विक्री १२ टक्क्यांनी वाढून ४,१३,२७९ युनिट्सवर गेली. बजाज ऑटोने देशांतर्गत दुचाकी विक्रीत ५ टक्क्यांची वाढ नोंदवली असून ती २,७३,१८८ युनिट्सपर्यंत पोहोचली. प्रीमियम विभागात रॉयल एनफील्डने दमदार पुनरागमन करत ४३ टक्क्यांची वाढ साधली आणि एकाच महिन्यात १,१३,५७३ मोटारसायकली विकल्या.

उद्योगांच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात कारखान्यांकडून डीलर्सना जवळपास ३.७५ ते ३.८० लाख वाहने पाठवण्यात आली, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत ५ ते ६ टक्क्यांनी जास्त आहे. किरकोळ विक्रीत झालेली २५ टक्क्यांची भरीव वाढ हे नवरात्र, कर कपात आणि कंपन्यांच्या ऑफर्स यांचे एकत्रित फलित असल्याचे मानले जात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राने या महिन्यात दाखवलेल्या वाढीमुळे उद्योगातील खेळाडूंना आगामी सणासुदीच्या हंगामाबद्दल अधिक आशावादी बनवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com