रिझर्व बँकेने वाढवलेला विकासदराचा अंदाज तसेच केंद्रात राजकीय स्थैर्याची हमी यामुळे आज शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार तेजी आली. आज सेन्सेक्स १,६१८.८५ अंश तर निफ्टी ४६८.७५ अंश वाढला. आज सेन्सेक्स ने शहात्तर हजारांवर मजल मारून नवा सर्वकालिक उच्चांक नोंदवला.
आज शेअर बाजारांचे व्यवहार सुरू झाल्यापासूनच सेन्सेक्स व निफ्टी नफा दाखवीतच उघडले. सेन्सेक्स पंचाहत्तर हजारांवरच उघडला आणि दोन तासातच त्याने ७६ हजारांचा टप्पा गाठला. त्यानंतर तो ७६ हजारांच्या खाली गेलाच नाही, दिवसभर त्याची चढती कमानच राहिली. दिवसअखेर सेन्सेक्स ७६ हजार ६९३.३६ अंशावर तर निफ्टी २३,२९०.१५ अंशांवर स्थिरावला.
या आठवड्याची भारतीय शेअर बाजार निर्देशांकांचा या वर्षभरातील सर्वात चांगला आठवडा म्हणून नोंद झाली आहे. मंगळवारी लोकसभा निवडणूक निकाल लागल्यावर घसरलेला सेन्सेक्स तेथून आतापर्यंत दहा टक्के वाढला आहे. आज सेन्सेक्सच्या मुख्य तीस शेअर पैकी सर्वच्या सर्व शेअरचे भाव वाढले होते. तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ४८ शेअरचे भाव वाढले. केवळ एसबीआय लाइफ एक टक्का आणि टाटा कंजूमर अर्धा टक्का घसरला.
आज आयटी शेअर मध्ये आलेल्या अनपेक्षित तेजीमुळेही निर्देशांक वाढले. या शेअरचे मूल्यांकन स्वस्त असल्यामुळे आज त्यांची खरेदी झाली. निफ्टी आयटी निर्देशांक आज साडेतीन टक्के वाढला, तर निफ्टी ऑटो, निफ्टी एनर्जी, निफ्टी इन्फ्रा, निफ्टी मेटल आणि निफ्टी रिअल्टी हे निर्देशांक प्रत्येकी दोन टक्के वाढले. आज फक्त पीएसयु बँक आणि पीएसयु निर्देशांक घसरले. बीएससी मिडकॅप निर्देशांक एक टक्का तर स्मॉल कॅप निर्देशांक दोन टक्के वाढले.
आज २, ५८६ शेअरचे भाव वाढले तर ८१० शेअरचे भाव कमी झाले आणि ८० शेअरचे भाव कालच्या इतकेच राहिले. सर्किटची मर्यादा वाढवल्याने आज पेटीएम दहा टक्के वाढला तर इंग्लंडच्या कोर्टाने टाटा केमिकल च्या तेथील उपकंपनीला दंड ठोठावल्यामुळे टाटा केमिकल चा भाव घसरला.
आज बी. एस. ई वर महिंद्र आणि महिंद्र तसेच विप्रो अनुक्रमे सहा आणि पाच टक्के वाढले. टेक महिंद्र, इन्फोसिस, टाटा स्टील, एअरटेल, बजाज फायनान्स या शेअरचे भाव चार ते साडेचार टक्के वाढले. अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, टाटा मोटर्स या शेअरचे भाव तीन ते साडेतीन टक्के वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिन्सर्व, जे एस डब्ल्यू स्टील या शेअरचे भाव अडीच टक्के वाढले. तर सन फार्मा आणि एचसीएल टेक या शेअरचे भाव दोन टक्के वाढले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.