देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी बजाज ऑटोने नुकतीच आपली पहिली CNG बाईक Freedom 125 बाजारात लॉन्च केली होती. ज्याला बाजारात खूप पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं. सीएनजी बाईकनंतर आता बजाज ऑटो पुन्हा चर्चेत आली आहे. अशी बातमी समोर अली आहे की, कंपनी 100 टक्के इथेनॉल इंधनावर धावणारी बाईक लॉन्च करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मॉडेल पुढील महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. याआधी टीव्हीएस मोटर्सने इथेनॉल इंधनावर धावणारी बाईक बाजारात आणली आहे. यातच बजाजच्या नवीन इथेनॉल बाईकमध्ये काय खास पाहायला मिळू शकतं, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून देशात 100 टक्के इथेनॉल इंधनावर धावणाऱ्या वाहनांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनेकदा इथेनॉल इंधनाबाबत बोलताना दिसले आहेत. तसेच याचा पर्यावरणासोबतच शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि जीवाश्म इंधनामुळे होणाऱ्या धोक्यांपासून पर्यावरणाचे रक्षण करते. हे इंधन उसापासून तयार केले जाते. इथेनॉल हे MTBE सारख्या घातक इंधनाला पर्याय म्हणून काम करते. इथेनॉल इंधन वापरल्याने नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते. हे पेट्रोल पेक्षा जास्त क्लिनर बर्निंग आहे. इथेनॉल कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स सारख्या प्रदूषकांचे कमी उत्सर्जन करते. यामुळे याचा पर्यावरणाला फायदा होतो.
बजाजच्या आधी टीव्हीएसने काही वर्षांपूर्वी भारतात Apache RTR 200 4V E100 लॉन्च केली होती. जी 80 टक्के इथेनॉल आणि 20 टक्के पेट्रोलवर धावणारी बाईक होती. पण या टीव्हीएसच्या या बाईकला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. नंतर कंपनीने याचे उत्पादन बंद केलं. अशातच बजाज ऑटो पल्सर नावाने इथेनॉल इंधनावर धावणारी बाईक बाजारात आणणार आहे. याला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे ही बाईक लॉन्च झाल्यावर कळेलच.
दरम्यान, बजाजच्या नवीन इथेनॉल बाईकमध्ये काय खास पाहायला मिळू शकतं, हे येत्या काही दिवसांत कळेलच. अद्याप याबाईकच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. कंपनी ही माहिती लवकरच जाहीर करू शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.