

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या आठवा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा चर्चेचा विषय बनला आहे. आयोगाच्या शिफारशींकडे देशभरातल्या लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. आयोग पुढच्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केंद्र सरकारला आपल्या शिफारशी सादर करू शकतो. त्याआधी आयोगाकडून सुरू असलेल्या बैठकांकडे कर्मचारी संघटनांचे लक्ष आहे.
आठव्या केंद्रीय वेतन आयोगाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी एक महत्त्वाचे नोटीफिकेशन जारी केलेले आहे. त्यानुसार आयोग २२ आणि २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात विविध संघटना, संस्था तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांशी संबंधित संघ आणि युनियनच्या प्रतिनीधींशी आयोग चर्चा करणार आहे.
मुंबईत आयोगासोबत चर्चा करू इच्छिणाऱ्या संघटना आणि संस्थांना ऑनलाइन प्रक्रियेच्या मदतीने भेटीसाठी विनंती करता येणार आहे. यासाठी इच्छुक प्रतिनिधींनी १० ऑक्टोबर २०२६ किंवा त्याआधी आपला अर्ज सादर करणं महत्त्वाचं आहे. मेमोरेंडम सादर केल्यानंतर मिळणारी Unique Memo ID देणं सुद्धा बंधनकारक आहे. त्यानंतर बैठकीचं ठिकाण आणि सविस्तर वेळापत्रक संबंधितांना कळवलं जाईल. या बैठकीत कर्मचारी संघटना वेतन, भत्ते आणि इतर सेवा- संबंधिक मागण्या आयोगासमोर मांडू शकतात.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये आयोगाच्या पुडुचेरी आणि चंदीगडमध्ये बैठका झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये ७ आणि ८ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये बैठका होणार आहेत.
आठव्या वेतन आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. Terms of Reference (ToR) नुसार आयोगाला स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत अंतिम शिफारशी सादर करायच्या आहेत. त्यामुळे अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत मे २०२७ ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.