Crime Podcast : 3 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांची हत्या; पैशांच्या लोभापायी घडलेलं एक भीषण हत्याकांड

A Horrifying Murder Happened By Greedy : १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
Crime Podcast
Crime PodcastSaam tV
Published On

Crime Unplugged | Marathi Crime Podcast : १३ जुलै १९९५. वृत्तपत्राचा अंक वाचकांच्या दारात पडला. पहिल्याच पानावर बातमी होती अमृतलाल जोशीला तीन खुनांच्या प्रकरणात फाशी. १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. या घटनेमुळं आणखी एक प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालं.

मुंबईच्या खार भागात असलेल्या लिंक अपार्टमेंटमध्ये राहणारं सदारंगानी कुटुंब. ७७ वर्षांचे परशुराम सदारंगानी, त्यांची मुलगी हेमा, जावई चंद्रू मिरचंदानी आणि या दांपत्याची तीन वर्षांची मुलगी वैशाली आणि एक तान्हे बाळ असे पाचजण या फ्लॅटमध्ये रहात होते. परशुराम सदारंगानींची दुसरी मुलगी रुक्मिणीचा विवाह मुळच्या बडोद्याच्या आणि त्यावेळी हाँगकाँगमध्ये रहात असलेल्या किशन रामचंदानी यांच्याशी झाला होता. रुक्मिणी नुकतीच आपल्या वडिलांकडं काही दिवस राहून बडोद्याला आपल्या सासरी गेली होती.

सदारंगानींचा जावई चंद्रू मिरचंदानी नरीमन पॉईंट परिसरात एका कंपनीच्या कार्यालयात एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला होता. सकाळी साडेदहा वाजता घर सोडायचं आणि संध्याकाळी उशीरा घरी परतायचं असा त्याचा नित्यपाठ.....४ ऑगस्ट १९८७चा दिवस. चंद्रू मिरचंदानींनी नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहाला घर सोडलं. बाकी कुटुंबिय घरातच होते. त्यावेळी आणखी एक व्यक्ती त्या घरात होती. तीनच महिन्यांपूर्वी सदारंगानींनी एक पोरगा स्वयंपाकासाठी नेमला होता. तो या फ्लॅटमध्येच रहायचा. त्याचं नाव अमृतलाल सोमेश्वर जोशी. तो मुळचा गुजरातचा. (Crime News)

दुपारी तीनच्या सुमारास सदारंगानी कुटुंबियांच्या फ्लॅटची साफसफाई आणि धुणी-भांडी करणारी पार्वतीबाई येऊन गेली. त्यावेळी परशुराम सदारंगानी आणि अन्य कुटुंबिय आपापल्या खोल्यांत वामकुक्षी घेत होते.

रात्री आठच्या सुमारास चंद्रू मिरचंदानी ऑफिसमधून घरी आले. त्यांच्याकडं घराची किल्ली नव्हती. दरवाजाला बाहेरुन कुलूप घातलं होतं, असं म्हणत चंद्रू मिरचंदांनी शेजारी राहणाऱ्या बालानी कुटुंबियांच्या घरी गेले. सकाळपासून कुणीच आलं नाही हे पाहिल्यावर चंद्रू मिरचंदानी काळजीत पडले.

आदल्या रात्री मिरचंदानी जेव्हा घरी आले त्याच्या आधी संध्याकाळी पाचच्या सुमाराला अमृतलाल घरातून चार-पाच सुटकेस आणि एक गाठोडं घेऊन अपार्टमेंटच्या बाहेर पडताना तिथल्या वॉचमननं रामबहादूर सिंगनं पाहिलं. (Saam TV Podcast)

Crime Podcast
Crime Podcast : अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं सातारा जलमंदिर चोरी प्रकरण, नेमकं काय झालं होतं?

आदल्या रात्री रामबहादूरनं ही माहिती चंद्रू मिरचंदानींना सांगितली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रू मिरचंदानींनी पहिला फोन सिंघवींना केला. पण आपलं कुटुंब तिथं गेलंच नाही हे कळल्यावर चंद्रूंनी बडोद्याला आपल्या मेव्हणीला. रुक्मीणीला फोन लावला. पण आपल्या घरचे तिथंही गेलेले नाहीत हे कळल्यानंतर चंद्रू रामचंदानींनी एक चावीवाला शोधला. त्याच्याकडून डुप्लिकेट चावी बनवून घेतली आणि फ्लॅटचा दरवाजा उघडला.

फ्लॅटमध्ये गेल्यावर चंद्रू मिरचंदानींना जबरदस्त धक्का बसला. एका बेडरुममध्ये त्यांचे सासरे परशुराम सदारंगानी बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दुसऱ्या बेडरूममध्ये चंद्रूंची पत्नी हेमा आणि तीन वर्षांची वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जमिनीवर त्यांचं तान्हं बाळ रडत पडलं होतं. चंद्रूंनी बाळाला उचललं आणि शेजारी राहणाऱ्या अरोरा कुटुंबियांकडं दिलं. चंद्रू मिरचंदानी प्रचंड शॉकमध्ये होते. मग अरोरांनी वेळ न घालवता बांद्रा पोलिस स्टेशनला फोन लावला.

सहाब हमारे अपार्टमेंटमें ट्रीपल मर्डर हुआ है. जल्दी आईये. असं सांगत अरोरांनी इन्स्पेक्टर ठाकूरांना पत्ता सांगितला. सदारंगांनींच्या फ्लॅटमधलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. कपाटाची दारं उघडी होती. आणि मुख्य म्हणजे अमृतलाल गायब होता. (Latest Breaking News)

Crime Podcast
Crime Podcast : भाच्यानेच केला घात; तिहेरी हत्याकांडाने अख्ख पुणे हादरलं होतं

इन्स्पेक्टर ठाकूर स्टेशन डायरी एंट्री करुन अन्य अधिकाऱ्याबरोबर फ्लॅटवर आले. तोपर्यंत चंद्रू मिरचंदानी काहीसे सावरले होते. अमृतलाल गायब असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी पंचनामा सुरु केला. कपाटात ठेवलेले ९२ हजार रुपये गायब आहेत आणि अमृतलालची ट्रंक आणि बेडिंग फ्लॅटमध्येच आहे हे चंद्रू मिरचंदांनींनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी संपूर्ण फ्लॅटची झडती घेतली. त्यांना फ्लॅटमध्ये चार चाकू सापडले. त्यातला एक खूपच मोठा होता आणि तो रक्तानं माखला होता. पोलिसांनी या सगळ्या वस्तू जप्त केल्या. अमृतलालवरचा संशय पक्का झाला झाला होता आणि अमृतलालला शोधण्याचं काम सुरु झालं. पण अमृतलाल होता तरी कुठं? असा सवाल पोलिसांना होता.

अमृतलालनं आदल्या दिवशीच मुंबई सोडली होती. सदारंगांनींच्या फ्लॅटमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं एक टॅक्सी भाड्यानं घेतली आणि तो थेट गुजरातला शामलाजी रोड जंक्शनला पोचला. तिथं त्यानं एक जीप टॅक्सी भाड्यानं घेतली. त्याला अंबाजी मंदिरात जायचं होतं. झहीर हुसेन नावाचा टॅक्सीवाला त्याला भेटला. अमृतलालनं जहीरच्या मदतीनं मुंबईहून आणलेलं सामान जीप टॅक्सीमध्ये भरलं आणि तो अंबाजी मंदीराच्या दिशेनं निघाला.

वाटेत दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. अमृतलालनं जहीरला गप्पांमध्ये गुंडाळायला सुरुवात केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमृतलाल आणि जहीर अंबाजी मंदिराच्या परिसरात पोचले. भाई माझ्यासाठी तीन दिवसांसाठी एखादी गेस्ट हाऊसची खोली बघ. अमृतलालनं जहीरला विनंती केली. त्यानुसार जहीरनं तिथल्या यावलबिडी गेस्ट हाऊसमध्ये अमृतलालसाठी खोली बूक केली.

Crime Podcast
Crime Podcast : बँक लुटून रातोरात करोडपती, पण पोलिसांनी अवघ्या १२ तासात केलेल्या कारवाईची लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मला आसपासच्या परिसरात फिरायचं आहे. मी तुला रोज तीनशे रुपये देईन टॅक्सीचे. अमृतलालनं जहीरला सांगितलं. जहीरनं ते मान्य केलं. जहीरच्या टॅक्सीनं अमृतलाल जवळच असलेल्या वडगावला गेला. या गावाजवळच अमृतलालचं स्वतःचं मूळ गाव होतं. त्याचं नाव डेभारी. त्यानंतर अमृतलाल जहीरला घेऊन वडगावला गेला. तिथं त्यानं आपल्या एका नातेवाईकाला बरोबर घेतलं. त्याचवेळी जहीरनं अमृतलालला विनंती केली.

भाई माझं गाव जवळच आहे. आपण जरा माझ्या घरीही जाऊन येऊयात. त्याप्रमाणं हे तिघेंही जहीरच्या गावाला प्रांतिजला गेले. तिथं काही वेळ थांबून ते अंबाजीला परतले. एका जागी फार काळ थांबून चालणार नव्हतं. त्यामुळं मी तुझ्याच घरी राहतो असं अमृतलालनं जहीरला सांगितलं. जहीर आता अमृतलालच्या पूर्ण कह्यात गेला होता. तो लगेच तयार झाला. दरमहा ८० रुपये भाडं देण्याचं अमृतलालनं जहीरला कबूल केलं.

त्यानंतर अमृतलालनं जहीरसमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला. जहीरची टॅक्सी विकत घेण्याचा. जहीरनं किंमत सांगितलं ८० हजार रुपये. अमृतलालनं त्याला ३० हजार रुपये रोख दिले आणि बाकी रक्कम पुढच्या काही दिवसांत देतो असं सांगितलं.

त्यानं ज्या नोटा दिल्या होत्या त्यांच्या बंडलांवर हाँगकाँग बँक आणि मुंबईच्या युनायटेड बँकेची लेबलं होती. याच बँकांमध्ये सदारंगानी आणि मिरचंदानींची खाती होती. अमृतलालजवळ असलेल्या बॅगांपैकी एका बॅगेत खूपशा व्हिडिओ कॅसेट आणि एक व्हिडिओ प्लेअर होता, तो नादुरुस्त होता. हा प्लेअर अमृतलालनं जहीरच्या एका ओळखीच्या मेकॅनिककडं दुरुस्तीला दिला.

पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील ही अमृतलालला सतत भीती होती. जो नातेवाईक सोबत घेतला होता त्याला अमृतलालनं डेभारी गावात जाऊन पोलिसांना कानोसा घेण्यास सांगितलं. त्याच्या हातून त्यानं आपल्या आईसाठी दोन हजार रुपयेही पाठवले.

हा नातेवाईक डेभारीला गेला. तिथं दुसऱ्या दिवशी एका झाडाखाली बसलेला असताना पोलिसांनी त्याला गाठलं आणि अमृतलालबद्दल विचारणा केली. घाबरलेल्या त्या नातेवाईकानं अमृतलाल प्रांतिज गावात असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तातडीनं प्रांतिज गाव गाठलं आणि अमृतलालच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या सामानाची झडती घेतली तेव्हा काही कपडे सापडले. त्यावर रक्ताचे डाग आढळले. हे कपडे पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून दिले.

Crime Podcast
Crime Podcast: पूजा विधीचं नाटक करुन सावज टिपायची; 11 महिलांची हत्या करणारी 'सायनाईड मल्लिका'

त्याच्या सामानाच्या झडतीत ४० हजार रुपये रोख. काही साड्या, परफ्यूम, लेडिज छत्री, कॅमेरा, पॉकेट रेडिओ, काही फोटो अल्बम, हेअर ड्रायर, अनेक विदेशी घड्याळं, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची चेन अशा अनेक वस्तू सापडल्या. घरकाम करणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणाला एवढ्या वस्तू खरेदी करणं शक्यच नव्हतं.

पोलिसांना दिलेल्या जबाबात अमृतलालनं अनेक कहाण्या रचल्या होत्या. खूनाची घटना घडली त्यावेळी आपण तिथं नव्हतोच. किंबहूना त्याच्या १०-१५ दिवस आधीच मी सदारंगानींकडची नोकरी सोडली होती. हा त्याचा जबाब होता. जे खून पडले होते त्यांची तीव्रता पाहता ते खून एकट्यानं करणंच शक्य नाही, असंही त्यानं पोलिसांना सांगून पाहिलं. सदारंगानी कुटुंबाचे स्नेही अंबरीश सिंघवी यांच्यावरही त्यानं आळ घेतला. खुद्द मिरचंदानी यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न अमृतलालनं केला.

कोर्टातही त्यानं आपल्या वकिलांच्या माध्यमातून हेच मु्द्दे मांडून आपली मान फाशीच्या दोरातून सोडवण्याचा प्रयत्न केला....पण त्यांच्या विरोधात दोन भक्कम साक्षीदार होते. एक म्हणजे त्याला बॅगा घेऊन लिंक अपार्टमेंटमधून बाहेर पडताना पाहिलेला सोसायटीचा वॉचमन रामबहादूर सिंग आणि धुणीभांडी करणारी पार्वतीबाई. या दोघांच्या साक्षी एवढ्या भक्कम होत्या की त्यापासून अमृतलाल वाचू शकला नाही.

हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्याचं होतं. खून करताना अमृतलालला कुणी पाहिलं नव्हतं. पण खूनाची घटना घडली त्यावेळी तो अपार्टमेंटमध्येच होता हे रामबहादूर सिंग आणि पार्वतीबाईच्या साक्षीतून समोर आलं. ट्रायल कोर्टानं अमृतलालला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. पुढं उच्च न्यायालयानं या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं आणि सर्वोच्च न्यायालयानंही फाशीची शिक्षा कमी करण्यास नकार दिला.

प्रतिकार करू न शकणारे एक वृद्ध गृहस्थ. एक महिला आणि तिची तीन वर्षांची मुलगी यांचा पैशाच्या मोहापायी खून करणाऱ्या निर्दयी अमृतलालला हीच शिक्षा योग्य होती. अखेर १२ जुलै १९९५ ला अमृतलालला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. लोभापायी घडलेलं एक भीषण हत्याकांड इतिहासाच्या पानात बंद झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com