Crime Podcast : भाच्यानेच केला घात; तिहेरी हत्याकांडाने अख्ख पुणे हादरलं होतं

Pune’s Infamous Oval Murder Case : पुण्याचा बाणेर परिसर आई, वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती.
Pune News
Pune News Saam Tv
Published On

Crime Unplugged | Marathi Crime Podcast:  पुण्याचा बाणेर परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. बाणेर परिसर आणि परिणामी संपूर्ण पुणे का भीषण घटनेनं थरारलं होतं. १९९२ हे ते वर्ष... याच बाणेर रस्त्यावर होता एक बंगला. ओहोळ कुटुंबियांच्या मालकीचा. बंगल्याचं नांव होतं रुमान. बाणेर रस्त्यावरच्या वर्षा पार्क सोसायटीत हा बंगला होता.

या बंगल्याचे मालक मोहन ओहोळ किर्लोस्कर न्य़ुमॅटिक्स कंपनीत उच्च पदावर होते. त्यांच्या पत्नी रुही पुण्याच्या स्पायसर कॉलेजमध्ये आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट इथं व्याख्यात्या होत्या. या दांपत्याला दोन मुलं. त्यापैकी मुलगा रोहन फर्ग्युसन कॉलेजमध्ये इलेक्ट्रोनिक्सचे शिक्षण घेत होता. तर मुलगी रैना फूड अँड क्राफ्टमध्ये शिकत होती. आठ दहा दिवसांपूर्वीच ती एका अभ्यासदौऱ्यासाठी मुंबईला गेली होती. (Crime News)

ओहोळ यांचे बंधू विजय साताऱ्यात उपजिल्हाधिकारी होते. त्यांचंही घर मोहन ओहोळ यांच्या घराजवळच होतं. २२ जुलै १९९२ रोजी ते पुण्यात आले होते. त्याच सुमारास मोहन ओहोळ यांच्या सासूबाई आजारी होत्या. पण मागचे एक दोन दिवस मोहन आणि त्यांच्या पत्नी रुही हे आपल्या सासूबाईंना आणि आईला भेटायलाच आलेले नाहीत असं विजय यांना समजलं.

त्यांनी फोन उचलला आणि मोहन ओहोळ यांच्या घरचा नंबर फिरवला. रिंग बराच वेळ वाजत राहिली पण पलीकडून कुणी फोन उचलत नव्हतं. चला प्रत्यक्षच जाऊन बघू हे गेलेत कुठं? असं म्हणून विजय ओहोळ रुमान बंगल्याकडं गेले. रात्री नऊची वेळ होती.

विजय ओहोळांनी रुमान बंगल्याची बेल दाबली. दार आतून बंद होतं. दोन तीनदा बेल वाजवूनही कुणी दार उघडत नाही हे पाहून त्यांनी सोसायटीच्या रखवालदाराला बनसोडेला हाक मारली. त्याला घेऊन विजय रुमान बंगल्याच्या मागच्या बाजूला गेले. तिथं बाथरुमच्या खिडकीतून मुंगळ्यांची रांग बाहेर येताना बनसोडेनं पाहिलं. अचानक भयानक दुर्गंधीही या दोघांना जाणवली. बनसोडे मग नाकावर रुमाल दाबत बाथरुमच्या खिडकीतून आत डोकावला आणि हादरला.

Pune News
Crime Podcast : बँक लुटून रातोरात करोडपती, पण पोलिसांनी अवघ्या १२ तासात केलेल्या कारवाईची लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

साहेब, साहेब... बाथरुममध्ये कुणीतरी पडलंय....पाय दिसतायत मला... घाबऱ्या आवाजात त्यानं विजय ओहोळांना सांगितलं. वेळ न घालवता दोघंही विद्यापीठ चौकातल्या पुना गेट पोलिस चौकीवर गेले. हा प्रकार ऐकल्यावर तिथले पोलिसही तातडीनं त्यांच्याबरोबर रुमान बंगल्यावर आले. बंगल्याचं मागचं दार फोडलं आणि सगळेजण आत गेले. तिथलं दृश्य भयानक होतं. मोहन ओहोळ त्यांची पत्नी रुही आणि मुलगा रोहन बाथरुममधल्या टबमध्ये मृतावस्थेत पडले होते. (Saam TV Podcast)

पोलिस अधिकाऱ्यांनी हा भयानक प्रकार आपल्या वरिष्ठांना कळवला. पोलिस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी रुमान बंगल्यावर हजर झाले. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं पोलिस आयुक्तांनी क्राईम ब्रँचचं एक पथक बनवायला सांगितलं. २० जुलैच्या रात्री आणि २१ जुलैला हे खून झाल्याचं पोस्टमॉर्टेमवरुन समजलं होतं. आणखीही एक धक्कादायक बाब पोस्टमॉर्टेममध्ये समजली होती आणि त्यातून या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं होतं. रुही ओहोळ यांच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाला होता. या तिघांचेही खून गळा आवळून झाले होते. या सर्वांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावण्यात आल्या होत्या आणि हातपाय दोरीने बांधलेले होते.

ओहोळ कुटुंबिय धर्मानं ख्रिश्चन होते. २४ जुलैला तिघांवर हडपसरच्या ख्रिश्चन दफनभूमीत अंत्यस्कार करण्यात आले. ज्या रात्री ओहोळ कुटुंबियांचे खून झाले त्या रात्री त्या घरात दोन पाहुणे होते आणि पहाटे हे पाहुणे ओहोळ यांची कार घेऊन निघून गेले ही माहिती पोलिसांना वॉचमनकडून समजली होती. त्यामुळं हे खून कुणा परिचितानंच केले आहेत, याचा अंदाज पोलिसांना आला होता आणि त्या दिशेनंच तपासाला सुरुवात झाली होती. ओहोळ कुटुंबियांवर अंत्यसंस्कार होत असताना पोलिस अधिकारीही साध्या वेशात तिथं उपस्थित होते. अंत्यविधीला ओहोळ कुटुंबियांचे कोण नातेवाईक आलेत यापेक्षा कोण आलेले नाहीत यातच पोलिस अधिकाऱ्यांना रस होता.

पोलिसांनी ओहोळ कुटुंबियांच्या नातेवाईकांची यादीच मिळवली होती. पोलिसांनी एकेकाला गाठून नातेवाईकांचे जबाब घ्यायला सुरुवात केली. ओहोळ कुटुंबियांच्या अंत्यसंस्काराला त्यांचे झाडून सगळे नातेवाईक हजर होते. नव्हता तो ओहोळ यांचा भाचा नितीन स्वर्गे. ओहोळ यांच्या घरातून ज्या वस्तू चोरीला गेल्या होत्या त्या पाहता चोरीसाठी हे खून झालेत हे मानायला पोलिस तयार नव्हते. त्याच दरम्यान पोलिसांना पुण्याजवळच शिरुरच्या परिसरात ओहोळ यांची कार सापडली. त्या ठिकाणी डॉगस्कॉड नेण्यात आलं. डॉगस्कॉडनं शिरुर बसस्थानापर्यंतचा मार्ग काढला. तिथं तपास खुंटला. पण पोलिसांनी हार मानली नव्हती.

Pune News
Crime Podcast: पूजा विधीचं नाटक करुन सावज टिपायची; 11 महिलांची हत्या करणारी 'सायनाईड मल्लिका'

दरम्यानच्या काळात पुणे शहरात ज्या बँकेत मोहन ओहोळ यांचं खातं होतं त्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलं. दरम्यानच्या काळात पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली होती. मोहन ओहोळ यांच्याकडून नितीननं पूर्वी ५० हजार रुपये व्यवसाय करण्यासाठी उसने म्हणून घेतले होते. त्यानंतरच्या काळात ओहोळ यांच्या सांगण्यावरुन नितीन नसरापूर इथं एका बांधकाम व्यावसायिकाकडं सुपरवायझर म्हणून कामाला लागला. या कामाचे ४८ हजार रुपये नितीनला मिळणार होते. हे पैसे परस्पर घेऊन मोहन ओहोळ यांनी पूर्वीचे ५० हजार रुपये वसूल केले होते....यातले काही पैसे मला द्या असा तगादा नितीननं लावला होता. त्यावरुन नितीन आणि मोहन ओहळ यांच्यात वादही झाला होता. आता नितीन पोलिसांच्या रडारवर आला होता.

पोलिसांनी २९ जुलैला मुंबईत दोन जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलं. मात्र त्यांची नावं जाहीर केली नाहीत. त्यांच्याजवळ ओहोळ कुटुंबियांच्या घरातून चोरीला गेलेल्या काही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. या दोघांचीही ओळखपरेड झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांची नावं उघड केली. (Latest Breaking News)

त्यापैकी एक होता नितीन स्वर्गे. ओहोळ यांचा भाचा आणि दुसरा होता रोनाल्ड अल्वारिस. त्यांच्याकडं कसून तपास सुरु झाला. त्यातून नाव समोर आलं ते तिसऱ्या साथिदाराचं, संतोष देसाईचं.

आता एकेक कडी उलगडायला लागली. नितिन स्वर्गे पैशांच्या मागं लागला होता. काहीही करुन झटपट पैसा मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. १८ जुलैच्या दिवशी नितीन, रॉनी आणि संतोष मुंबईहून पुण्याला आले. त्या दिवशी त्यांनी स्वारगेट परिसरात हॉटेलची एक खोली भाड्याने घेतली.

पुण्याजवळच असलेल्या किकवी गावातली एक बँक लुटण्याचा त्यांचा विचार होता. पण काही कारणानं तो बारगळला. २० जुलैच्या संध्याकाळी हे तिघं रिक्षानं ओहोळ यांच्या रुमान बंगल्यावर पोचले. तिथं रोहन आपल्या मित्राबरोबर बाहेर उभा होता. (हा नितीन माझा मावसभाऊ) रोहननं नितीनची आपल्या मित्रांशी ओळख करुन दिली.

त्यावेळी बंगल्याच्या आसपास पावसामुळं चिखल झाला होता. या तिघांचेही बूट चिखलानं भरले होते. बाहेर खूप पाऊस आहे आम्ही तिघं आज इथंच राहणार आहोत, हे नितीननं रोहनला सांगितलं. काही वेळानं मोहन आणि रुही ओहोळही घरी आले. रात्री जेऊन सर्वजण झोपायला गेले. त्यानंतर या तिघांनी चोरीच्या उद्देशानं घर धुंडाळायला सुरुवात केली. नीतिन काय करतोयस, काय हवंय काय तुला, का ड्रॉवर शोधतो आहेस, ते रोहननं पाहिलं. त्यामुळे या तिघांनी त्याला धरलं आणि त्याचा गळा आवळून खून केला.

Pune News
Crime Podcast: दिल्ली हायप्रोफाइल हत्याकांड; तत्कालीन राष्ट्रपतींच्या खासगी डॉक्टरच्या पत्नीच्या हत्येनं अख्खा देश हादरला

त्यानंतर या तिघांनी मोहन ओहोळ यांचाही गळा आवळून खून केला. रुही यांचा गळा आवळण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिघांना मारल्यानंतर त्यांचे मृतदेह बाथरुममधल्या टबात टाकून तिघं बाहेर पडले आणि ओहोळ यांची कार घेऊन पळाले. (या चेकवर सही करा, लगेच)

ओहोळ यांना मारण्यापूर्वी त्यांनी एका चेकवर त्यांची सही घेतली आणि मग त्यांचा खून केला.

तिथून हे तिघंही ओहोळ यांची कार घेऊन शिरुरला गेले. तिथं त्यांनी ओहोळ यांची कार सोडून दिली आणि नितीन पुण्यात आला आणि रॉनी आणि संतोष मुंबईला निघून गेले. पुण्याला आल्यानंतर नितीन यांच्याकडून जबरदस्तीनं लिहून घेतलेला चेक घेऊन त्यांच्या बँकेत गेला. त्यानं तिथं टोकन घेतलं. मात्र, ओहोळ यांची सही जुळत नसल्याचं बँकेतल्या कारकूनाच्या लक्षात आल्यावर त्यानं ओहोळ यांना घेऊन या किंवा त्यांची नव्यानं सही घेऊन या असं नितीनला सांगितलं.

हे ऐकल्यावर नितीन टोकन परत न करताच बँकेबाहेर पडला. वाटेत त्यानं कँप भागातल्या एका सराफाकडं रुही ओहोळ यांची सोन्याची कर्णफुलं गहाण टाकली आणि पैसे घेऊन तोही मुंबईला गेला. मुंबईला गेल्यावर संतोषनं बँकेचं ते टोकन एका विहिरीत टाकून दिलं. त्यांतर चोरी केलेल्या उरलेल्या मालाची त्यानी वाटणी केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली....

पोलिसांनी कसून तपास करुन हा सगळा गुन्हा उघडकीला आणला. पुण्यात या तिघांच्या विरोधात खटला चालवण्यात आला. पुण्याच्या सत्र न्यायालयानं या तिघांना खुनाच्या गुन्ह्याबद्दल फाशी आणि बलात्काराच्या आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानंही ही शिक्षा कायम केली. मात्र पुढे सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलात ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. पैशांच्या मोहापायी आणि सुडापायी काय घडू शकतं हे दाखवणारं हे प्रकरण इतिहासाच्या फायलीत अखेर बंद झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com