स्वतःचा जीव धोक्यात असताना इतरांचा विचारही एखाद्याच्या मनाला स्पर्श करत नाही. पण एका नवविवाहितेनं आणि तिच्या पतीनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या दुचाकीस्वाराचा जीव वाचवलाय. ओढणीच्या मदतीनं तिनं या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या नवदाम्पत्याच्या धाडसाचं कौतुक होत आहे.
माणुसकी आणि धाडसाचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील ही दृश्ये आहेत. मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुरात एक दुचाकीस्वार अडकला. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्याला त्यात तग धरणं मुश्किल होतं. पण कारमधून आलेल्या एका कुटुंबानं स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणाला मदत करण्याचा निर्णय घेतला. या कारमध्ये नवविवाहित जोडपं होतं. प्रसंगावधान आणि धाडस दाखवत नवविवाहितेनं आणि तिच्या पतीनं ओढणीच्या मदतीनं या तरुणाचा जीव वाचवला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंबा जिल्ह्यातील भटियात भागात ककीरा-तुनुहट्टी रस्त्यावर पुराचं पाणी साचलं होतं. मुसळधार पावसामुळं काही कळायच्या आत रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. या रस्त्यावरून जाणारा एक दुचाकीस्वार तरूण या पुरात अडकला. मृत्यू समोर उभा ठाकला असताना तो तरूण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका कुटुंबानं कार थांबवली आणि त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला कारमधील एका तरुणानं दुचाकीस्वारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यालाही शक्य होत नव्हतं. त्यानंतर कुटुंबातील दोन महिलाही मदतीसाठी पुढे आल्या. त्यात एक नवविवाहित महिलाही होती. तिनं प्रसंगावधान राखून आपल्याजवळील ओढणी दिली. ती ओढणी तरुणापर्यंत पोहोचली. त्यानं ओढणी कशीबशी पकडली आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचला. या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दुचाकीस्वाराचा जीव वाचवणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.