भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने लव जिहाद, लँड जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाल्याचा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय...त्यावरून चांगलंच राजकारण तापलंय...
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनीही भाजपचा खरपूस समाचार घेतलाय. भाजप मतांसाठी भ्रष्टाचाऱ्यांशी निकाह लावत असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर भाजपला जिहाद बोलल्याशिवाय मतंच मिळणार नाहीत असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय.
मुस्लिम मतदारांनी लोकसभेच्या 14 मतदारसंघावर प्रभाव टाकल्याचा दावा फडणवीसांनी केला असला तरी त्याचा विधानसभा निवडणुकीत किती मतदारसंघावर प्रभाव असणार आहे.
राज्यात मुस्लिम समाजाची 16 टक्के लोकसंख्या आहे. लोकसभेला 15 मतदारसंघात अल्पसंख्याक मतं निर्णायक ठरली. विधानसभेत 32 जागांवर अल्पसंख्याकांचा प्रभाव आहे.
राज्यातले ३२ विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याकांची मतं निर्णायक असली तरी याला विरोध करून इतर मतदारसंघामध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाची भाजपची रणनीती असल्याचं दिसतंय. त्यामुळेच लोकसभेतच ज्या मुद्यांमुळे भाजपला फटका बसलाय त्या मुद्दांवर भाजप विधानसभेसाठी सावध भूमिका घेत पावलं टाकत असल्याचं दिसतंय. मात्र हा मुद्दा किती प्रभावी ठरणार याचीच उत्सुकता आहे.