आयफोन १७ (iPhone 17) मालिका आज भारतासह जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबईतील बीकेसी येथील अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मध्यरात्रीपासूनच उत्साही ग्राहक रांगा लावत आयफोन खरेदीसाठी थांबले होते. या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा सुरू आहे. मुंबईतील अॅपल स्टोअरसमोर आयफोन-17 खरेदीसाठी एवढी गर्दी झाली की गोंधळ उडाला. ग्राहकांमध्ये वाद वाढून हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचली.
अॅपलने ९ सप्टेंबर रोजी 'अवे ड्रॉपिंग' कार्यक्रमात आयफोन १७ मालिका जगासमोर आणली होती. या मालिकेत आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स असे चार मॉडेल्स लाँच करण्यात आले होते. आजपासून या सर्व फोनची विक्री भारतात अधिकृतपणे सुरू झाली आहे. नवीन मॉडेल्स घेण्यासाठी ग्राहकांचा उत्साह प्रचंड असून, अनेक जण इतर राज्यांमधून खास मुंबईत दाखल झाले आहेत. अहमदाबादचे रहिवासी मनोज यांनी सांगितले की, ते दरवर्षी नवीन आयफोन खरेदीसाठी मुंबईत येतात आणि यंदाही पहाटेपासून स्टोअरबाहेर उभे राहून त्यांनी नवीन आयफोन १७ विकत घेतला.
किंमतींच्या दृष्टीने पाहता, आयफोन १७ च्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८२,९०० रुपये आहे, तर आयफोन एअर १,१९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन १७ प्रोची किंमत १,३४,९०० रुपये असून, आयफोन १७ प्रो मॅक्स १,४९,९०० रुपयांना विक्रीस आहे. कंपनीने सर्व मॉडेल्स बेस २५६ जीबी व्हेरिएंटमध्येच लाँच केले आहेत.
दरम्यान, काही देशांमध्ये ऑनलाईन प्री-ऑर्डर दरम्यान आयफोन १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्स पूर्णपणे विकले गेले आहेत. त्यांची डिलिव्हरी ऑक्टोबरपर्यंत उशिरा मिळेल अशी माहिती दिली जात आहे. मात्र, थर्ड-पार्टी स्टोअरमधून ग्राहकांना आयफोन १७ खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकांचा हा उत्साह पाहता, अॅपलच्या या नव्या मालिकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.