इंग्लंड आणि टीम इंडिया या दोन बलाढ्य संघांत ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झालीय. टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज आणि ३ विकेटकीपर आहेत.
टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर जसप्रीत बुमराह हा उपकर्णधार असेल. विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याला टीम इंडियात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. युवा खेळाडू आणि नवा चेहरा टीम इंडियात असणार आहे.
ध्रुव याच्या व्यतिरिक्त संघात के. एस. भरत, के. एल. राहुल हे दोन अतिरिक्त विकेटकीपर देखील आहेत. पहिला कसोटी सामना २५ जानेवारीला हैदराबाद आणि दुसरा सामना २ फेब्रुवारीला विशाखापट्टणममध्ये होईल. टीम इंडियात निवड झालेला ध्रुव जुरेल नेमका कोण आहे? आणि त्याला टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान का देण्यात आलं ? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत. (Latest sports updates)
संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोघेही फलंदाज- विकेटकीपर आहेत. या दोघांना चीफ सिलेक्टर अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवड समितीनं संधी दिली नाही याचं आश्चर्य आहे. ध्रुव आयपीएल २०२३ मध्ये आयपीएल खेळला होता. त्यावेळी केलेल्या कामगिरीनं निवड समितीचं लक्ष वेधलं होतं.
ध्रुव जुरेल हा अवघ्या २२ वर्षांचा आहे. २१ जानेवारी २००१ रोजी उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे त्याचा जन्म झाला. २०२० अंडर १९ वर्ल्डकप खेळलेल्या टीम इंडियात तो होता. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. टीम इंडिया त्यावेळी फायनलमध्ये बांगलादेशकडून डकवर्थ लुईसनुसार ३ विकेटनं पराभूत झाली होती.
विकेटकीपर फलंदाज असलेला ध्रुव जुरेल हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. सुंदर फटकेबाजी ही त्याची जमेची बाजू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. अंडर १९ संघात यशस्वी जयस्वाल, तीलक वर्मा, रवी बिश्नोई, प्रियम गर्ग यांचा तो सहकारी खेळाडू आहे. उत्तर प्रदेश संघात रिंकू सिंहसोबत तो खेळतो.
ध्रुव जुरेलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत तो १५ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. ४६.४७ च्या सरासरीने त्याने ७९० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक, ५ अर्धशतके आहेत. तर यष्टीमागे त्याने ३४ झेल आणि दोन यष्टीचीत केले आहेत.
आयपीएलच्या १५ व्या मोसमाच्या आधी लिलावात राजस्थान रॉयल्सने ध्रुव जुरेलला आपल्या संघात घेतलं. २० लाख रुपयांत त्याला संघात घेतलं. आयपीएल २०२३ मध्ये ध्रुवने आयपीएलमध्ये कमी धावा केल्या असल्या तरी, त्याच्या छोट्या इनिंग लक्षात राहण्यासारख्या होत्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यानं पदार्पण केलं. गुवाहाटीत पंजाब किंग्जविरुद्ध त्याने १५ चेंडूंत ३२ धावांची स्फोटक खेळी केली. त्यामुळे तो चर्चेत आला.
जुरेलने एका मुलाखतीत सांगितलं की, क्रिकेट खेळण्यास त्याच्या वडिलांनी सपोर्ट केला नाही. एक दिवस वडील वर्तमानपत्र वाचत होते. त्यात ध्रुव जुरेल हे नाव होते. त्याने खूप धावा केल्या होत्या. त्यावर वडिलांचं लक्ष गेलं. हे त्यांनी ध्रुवला सांगितलं. त्यावेळी ध्रुव खूप घाबरला होता. तो मीच आहे हे त्यानं वडिलांना सांगितलं नाही. क्रिकेट सोडण्यास सांगतील, अशी त्याला भीती होती.
त्यानंतर क्रिकेटमध्येच करिअर करू शकतो, असा विश्वास त्याला मिळाला. १४ वर्षांचा असताना ध्रुवला क्रिकेट किट हवी होती. त्यावेळी अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असं वडिलांनी त्याला बजावलं होतं. त्याच्या आईनं क्रिकेट किटसाठी दागिनेही विकले. १५००-२००० रुपयांची बॅट होती. ती देखील घेणं परवडणारे नव्हते. पण वडिलांनी त्याला बॅट खरेदी करून दिली होती. पण संपूर्ण किट खरेदी करून देणं त्यांच्या अवाक्याबाहेर होते, अशी आठवण त्याने मुलाखतीत सांगितली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.