नुकतंच इंग्लंडची लीग 'द हंड्रेड'चं ऑक्शन पार पडलं. हे ऑक्शन झाल्यानंतर एक मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. भारतीय कंपनी सन ग्रुपच्या फ्रॅंचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेण्यावरून हा वाद पेटला होता. सनरायझर्स लीड्स या टीमची मालकीण काव्या मारन हिने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला विकत घेतलं. यानंतर काव्या सोशल मीडियावर ट्रोल झाली. यामध्ये भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनीही यावर प्रतिक्रिया देत मॅनेजमेंटचे कान टोचले आहेत.
गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना दिलेले पैसे हे भारतीयांच्या मृत्यूमध्ये एक योगदान आहे.
द हंड्रेड लीगच्या ऑक्शनदरम्यान काव्याने अबरार अहमदवर 1 लाख 90 हजार पाउंड इतकी बोली लावली. भारतीय चलनानुसार हा आकडा २.३ कोटी इतका आहे. याशिवाय सनरायझर्सचे कोच डॅनियल विटोरीच्या म्हणण्याप्रमाणे, पाकिस्तानचा स्पिनर उस्मान तारिकला देखील विकत घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मिड-डे मधील कॉलममध्ये सुनील गावस्कर लिहितात की, द हंड्रेड लीगमध्ये एका भारतीय फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्यानंतर जो काही गदारोळ माजला त्यामुळे मला अजिबात धक्का बसलेला नाही. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय फ्रेंचायझींनी आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना विकत न घेण्याचा निर्णय घेतला. उशिरा का होईना, आपल्याला हे लक्षात आलं की, पाकिस्तानी खेळाडूंना दिले जाणारे पैसे हे अप्रत्यक्षरित्या भारतीय सैनिकांच्या मृत्यूमध्ये योगदान देण्यासारखं आहे.
गावस्करांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी खेळाडू त्यांना मिळालेल्या पैशांमधून त्यांच्या सरकारला टॅक्स देतात. याच पैशांतून हत्यारं आणि दारूगोळा खरेदी केला जातो. त्यामुळे भारतात पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना बोलावणं बंद केलं.
कोणतीही कंपनी किंवा तिची ओवरसीज सब्सिडियरी जरी पेमेंट करत असेल, आणि त्यांचा मालक हा भारतीय असेल तरीही याचा अर्थ आपण सैनिकांच्या मृत्यूंमध्ये योगदान देत आहोत, हे समजणं अगदी सोपं आहे. सनरायझर्स लीडचे कोच डॅनियल विटोरी कदाचित हे समजू शकत नाहीत, मात्र टीमच्या मालकाला हे समजायला हवं होतं.
जेव्हा २००८ साली आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचाही त्यामध्ये समावेश होता. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आणण्यात आली. त्यानंतर ११ वर्षांनी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला गेला. इतकंच नाही तर २०२५ मध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत काही भारतीयांची हत्या केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.