भारताचा विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यरच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ उतार आले आहेत. देशांतर्गत क्रिकेटला पाठ फिरवल्यामुळे, अय्यरला बरेच महिने संघाबाहेर राहावं लागलं. आता देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर त्याला भारतीय वनडे संघात खेळण्याची संधी मिळाली.
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्याच सामन्यात त्याने वादळी अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. या क्रमांकावर अनेक दिग्गज फलंदाज खेळून गेले आहेत. मात्र जो कारनामा श्रेयसला करता आला आहे, तो आजवर कोणालाच जमलेला नाही. वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना असे ४ फलंदाज आहेत ज्यांनी ५० च्या सरासरीने फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
मात्र या यादीत श्रेयस अय्यर अव्वल स्थानी आहे. कारण त्याने नंबर ४ वर फलंदाजी करताना ५० पेक्षाही अधिकच्या सरासरीने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा १०० पेक्षा अधिक आहे.
विराट कोहली प्लेइंग ११ मधून बाहेर असल्यामुळे श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या वनडेत फलंदाजी करताना त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने तुफानी ५९ धावा केल्या. यादरम्यान त्याने १६३.८९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. श्रेयस अय्यर ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी भारतीय संघावर दबाव होता. कारण रोहित आणि जयस्वालची जोडी स्वस्तात बाद होऊन माघारी परतली होती.
अवघ्या १९ धावांवर भारताला २ धक्के बसले होते. मात्र त्याने कुठरलाही दबाव घेतला नाही. त्याने सुरुवातीलाच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या षटकात सलग २ षटकार खेचले. श्रेयसने केलेल्या या खेळीच्या बळावर भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं. श्रेयस अय्यरनंतर अक्षर पटेल आणि शुभमन गिलने देखील अर्धशतकी खेळी केली आणि इंग्लंडवर विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला २४८ धावा करता आल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी २४९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने देखील अर्धशतकं झळकावली. यासह भारताने हा सामना ४ गडी राखून नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.