इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या सिझनमधील प्लेऑफच्या सामन्यांचा वेन्यू जाहीर करण्यात आलाय. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे रोजी जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने धर्मशाला आणि न्यू चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आलेत.
बीसीसीआयने यासंदर्भात एक निवेदन जाहीर केलं होतं. या निवेदनात बीसीसीआयने नमूद केलंय की, अंतिम सामन्यासाठी आरसीबीचं होम ग्राऊंड एम. चिन्नास्वामीची निवड करण्यात आली होती. मात्र स्थानिक असोसिएशन आणि अधिकाऱ्यांच्या मागण्यांमुळे ठिकाण बदलावं लागलं.
मंगळवारपर्यंत आयपीएल २०२६ मध्ये ४८ सामने खेळले गेलेत. प्लेऑफची लढत रोमांचक झाली असून अनेक टीम्स २० पॉईंट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोणतीही टीम अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडलेली नसली तरी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोन्ही टीमसाठी हा मार्ग फारच खडतर मानला जातोय.
क्वालिफायर १ हा सामना २६ मे रोजी धर्मशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना पॉईंट्स टेबलमधील अव्वल दोन टीम्समध्ये खेळला जाणार आहे. विजेती टीम पहिली फायनल गाठणारी टीम असणार आहे. तर पराभूत टीमला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
२७ मे रोजी आयपीएलमधील एलिमिनेटर सामना होणार आहे. हा सामना न्यू चंदीगडमधील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना पॉईंट्स टेबलमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या टीम्समध्ये रंगणार आहे. विजेती टीम क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करणार आहे. तर यामध्ये पराभूत होणारी टीम थेट आयपीएलमधून बाहेर पडणार आहे.
फायनल सामना क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ च्या विजेत्यांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षीचा अंतिम सामना याच मैदानावर झाला होता. या ठिकाणी आरसीबीने त्याचं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. २०२२ आणि २०२३ चे अंतिम सामने देखील अहमदाबादमध्येच आयोजित करण्यात आले होते.
क्वालीफायर-1: 26 मे- हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम, धर्मशाला
एलिमिनेटर: 27 मे- न्यू इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंडीगढ
क्वालीफायर-2: 29 मे- न्यू इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंडीगढ
फायनल- 31 मे- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.