India - Pakistan Head to Head Record at Dubai : भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला होत आहे. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये रविवारी, २३ फेब्रुवारीला हा सामना होत आहे. दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल. त्याआधीच भारतासाठी मोठी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे.
भारत-पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आशिया कपमध्ये १९ सप्टेंबर २०१८ रोजी आमनेसामने आले होते. त्यावेळी भारतीय संघानं ८ विकेट्सनं विजय मिळवला होता. त्यावेळी पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच भुवनेश्वर कुमारनं त्यावेळी ७ ओव्हरमध्ये अवघ्या १५ धावा दिल्या होत्या आणि तीन विकेट्स घेतल्या होत्या.
केदार जाधवने तीन विकेट्स, जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मानं ५२ धावांची तुफानी खेळी केली होती. तर शिखर धवनने ४६ धावा कुटल्या होत्या. दिनेश कार्तिकने नाबाद ३१ धावा, अंबाती रायडूनं नाबाद ३१ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता.
दुबईत २३ सप्टेंबर २०१८ रोजी पुन्हा हे दोन्ही देश सुपर फोरमध्ये समोरासमोर उभे ठाकले होते. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना सात विकेट्स गमावून २३७ धावा केल्या होत्या. शोएब मलिकने ७८ धावांची सुरेख खेळी केली. त्या सामन्यात पुन्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन चमकले. रोहितने नाबाद १११ धावा, तर शिखर धवनने ११४ धावा चोपल्या होत्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला ९ विकेट राखून नमवलं.
दुबईत लय भारी रेकॉर्ड
दुबईत जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा विजय हा भारतीय संघाचा झाला. तर एकूण वनडे सामन्यांत पाकिस्तानचं पारडं जड आहे. दोन्ही देशांत एकूण १३५ वनडे लढती झाल्या. ५७ वेळा भारतानं, तर ७३ सामन्यांत पाकिस्ताननं विजय मिळवला आहे. ५ सामने अनिर्णित राहिले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी हा सामना करो या मरो असाच आहे. पण भारतीय संघ विजयी लयीत आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आव्हान असणार आहे. भारताविरुद्ध पराभव झाल्यास यजमान पाकिस्तानच चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाद होईल.
भारतीय संघानं पहिल्याच सामन्यात बांगलादेशला हरवलं होतं. पाकिस्तानला धूळ चारली तर, टीम इंडियाचं सेमिफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होईल. पाकिस्तान संघ पराभूत झाला तर, त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळेल.
पाकिस्तान संघाविरुद्ध रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता खूप कमी आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघ जायबंदी असलेल्या फखर जमांच्या जागेवर इमाम उल हकला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप जाधव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ११ - बाबर आझम, सउद शकील, मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, सलमान अली आगा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, अबरार अहमद, हारिस रऊफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.