नवी दिल्ली : पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. भारताचा वेस्ट इंडिजवर हा सलग 12 वा मालिका विजय आहे. एकवेळ भारतीय संघ हा सामना गमवणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र भारताच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू अक्षर पटेल. (IND vs WI 2nd ODI Latest Updates)
अक्षरने कठीण परिस्थितीत नाबाद 64 धावांची खेळी केली. भारताला विजय मिळवून देऊनच तो परतला. अक्षरचं हे वनडेतील पहिलं अर्धशतक आहे. अक्षरने फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने9 षटकात 40 धावा देत 1 गडी बाद केला. अक्षर पटेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अक्षरशिवाय श्रेयस अय्यरने 63 आणि संजू सॅमसनने 54 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रेयस अय्यर, संजू सॅमसनच्या अर्धशतकानंतर अक्षराच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 49.4 षटकांत लक्ष्य गाठले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या शाई होपने सलामीवीराची भूमिका चोख बजावली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत वेस्ट इंडिजला होप आणि काइल मायर्स यांनी चांगली सुरुवात करून दिली.
मायर्सने आक्रमक फलंदाजी करत चौथ्या आणि सहाव्या षटकात चौकार मारले, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकांमध्ये 36 धावा दिल्या. मायर्सने पहिल्या दोन चेंडूंवर ठाकूरला एक चौकार आणि एक षटकार ठोकला. सिराजने मात्र सलामीच्या स्पेलमध्ये दमदार गोलंदाजी केली. दीपक हुडाने मायर्सला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. काईल मायर्सने (39 धावा) होपसोबत पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर तिसर्या क्रमांकावर उतरलेल्या शे होपने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने कायले मेयर्ससह 65 धावांची भागीदारी केली. त्यानंतर होपने शामार्ह ब्रुक्ससह 62 धावांची आणि कर्णधार निकोलस पूरनसह 117 धावा जोडल्या. पूरन 77 चेंडूंत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 74 धावांवर त्रिफळाचीत झाला. होपने त्यानंतर षटकार खेचून शतक पूर्ण केलं.
100 व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला आहे. सलामीवीर शे होपने 135 चेंडूत 115 धावांची खेळी केली. 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला काही वेळातच मोठा झटका बसला. कर्णधार शिखर 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर गिल आणि अय्यरने डाव सावरला, पण 43 धावा करुन गिलही बाद झाला. सूर्यकुमार (9) स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला.
63 धावा करुन अय्यर बाद झाला, पण संजूने झुंज कायम ठेवली. मात्र 54 धावा करुन तोही बाद झाला. भारताची स्थिती बिकट झाली असताना दीपक हुडाने अक्षर पटेलसोबत मोर्चा सांभाळला. दोघांनी फटकेबाजी सुरु केली. पण तितक्यात 33 धावा करुन हुडा बाद झाला. अक्षरच्या खांद्यावर सर्व सामना येऊन ठेपला. त्याच वेळी त्याने अगदी अप्रतिम कामगिरी करत संयमी अर्धशतक ठोकलं.
कारकिर्दीतील पहिलं वहिलं एकदिवसीय अर्धशतक ठोकत त्याने सामना भारताला जिंकवून दिला. 35 चेंडूत 3 चौकार तर 5 षटकार ठोकत अक्षरने नाबाद 64 धावा केल्या. यावेळी अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत अक्षरने विजय पक्का केला. अक्षरलाच सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.