न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) बुधवारी आपल्या २०२६/२७ च्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सिझनचं शेड्यूल जाहीर केलंय. या सिझनचं सर्वात मोठं आकर्षण भारताचा ऐतिहासिक दौरा असणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भारतीय पुरुष टीम न्यूझीलंडच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या द्विपक्षीय क्रिकेट दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये १२ सामने असून पाच टी-२० , पाच वनडे आणि दोन टेस्ट सामन्यांचा समावेश आहे.
टीम इंडिया २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही परदेशी टीमच्या सर्वात मोठ्या दौऱ्यांपैकी हा एक मानला जातोय. सामने पाच प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अधिकारी ग्लेन क्रिचले यांनी सांगितलं की, "जेव्हा क्रिकेटचा विषय येतो तेव्हा भारतापेक्षा मोठा देश दुसरा कोणी नाही. आम्ही न्यूझीलंडच्या लोकांना असा दौरा देणार आहोत जो त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवला नसेल. हा केवळ क्रिकेटचा दौरा नसेल तर आपल्या सामायिक इतिहासाचा, संस्कृतीचा आणि वाढत्या मैत्रीचा एक उत्सव असेल."
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी-२० आंतरराष्ट्रीय सिरीजने होणार आहे. पहिला टी-२० सामना २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जाणार आहे. दुसरा टी-२० सामना देखील २४ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्चमध्येच खेळला जाईल. तिसरा टी-२० सामना २७ ऑक्टोबर रोजी वेलिंग्टनमध्ये, चौथा टी-२० सामना ३० ऑक्टोबर रोजी ऑकलंडमधील ईडन पार्कवर आणि पाचवा व अंतिम टी-२० सामना १ नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमधील सेडन पार्कवर खेळवला जाईल.
टी-२० सिरीजनंतर पाच वनडे सामन्यांच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. पहिला वनडे सामना ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये, दुसरा ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये आणि तिसरा १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाणार आहे. चौथा आणि पाचवा वनडे सामना अनुक्रमे १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी माउंट मौंगानुई (टॉरंगा) मधील बे ओव्हलवर खेळवला जाईल.
यानंतर दोन टेस्ट सामन्यांची सिरीज होईल. पहिली टेस्ट १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्हमध्ये खेळवली जाईल. दुसरी आणि अंतिम टेस्ट २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ दरम्यान क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळवली जाणार आहे. संपूर्ण दौरा २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.