क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक आणि मोठ्या समजल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसंबंधी आयसीसीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा आता नव्या ढंगात, नव्या स्वरुपात खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल केला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच थरार बघायला मिळणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धेत पूर्वीप्रमाणेच १४ संघ सहभागी होणार आहेत. मात्र, वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान आधीपेक्षा अधिक कठीण होणार आहे. आयसीसीने ग्रुप स्टेजआधी सुपर सीरीज हा एक नवा टप्पा जोडला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांचे महत्व अधिक वाढणार असून, सामने रोमहर्षक होणार आहेत.
वर्ल्डकप स्पर्धेच्या नव्या स्वरुपानुसार, सर्वात कमी रँकिंग असलेले तीन संघ सुपर सीरीजच्या फेरीत खेळतील. या टप्प्यातील एकच संघ मुख्य फेरीत पोहोचेल. तर उर्वरित दोन संघ स्पर्धेबाहेर होतील. त्यानंतर १२ संघ पुढच्या फेरीत खेळतील. ते दोन ग्रुपमध्ये विभागले जातील. म्हणजेच एका गटात सहा संघ असतील. दोन्ही गटातील अव्वल तीन संघ थेट पुढच्या फेरीत पोहोचतील. याशिवाय दोन्ही गटातील चौथ्या स्थानावर असलेल्या दोनपैकी चांगली कामगिरी करणारा एक संघ पुढच्या फेरीत पोहोचेल. त्यामुळे एकूण सात संघ सुपर ७ फेरीत असतील.
सुपर ७ मधील सर्वच्या सर्व सात संघ राउंड - रॉबिन फॉरमॅटनुसार एकमेकांना भिडतील. या फेरीतील अव्वल ४ संघ सेमिफायनलमध्ये प्रवेश करतील. त्यातील विजेते संघ फायनलमध्ये आमनेसामने असतील. फायनलमधील विजेत्या संघाला चॅम्पियन घोषित केले जाईल.
एडिनबर्गमध्ये आयसीसीची वार्षिक बैठक झाली. त्यात या बदलांना मंजुरी देण्यात आली. प्रत्येक सामना महत्वपूर्ण, रोमहर्षक, याशिवाय खेळाडू आणि प्रेक्षकांना उत्तम स्पर्धेचे अनुभव देणे, उदयोन्मुख संघांना मोठ्या मंचावर आपली क्षमता दाखवण्याची संधी देणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, नव्या फॉरमॅटमध्ये सुरुवातीच्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या निकालाचा परिणाम पुढील लढतीवर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा रोमहर्षक आणि थरारक होणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम लढत २७ नोव्हेंबर २०२७ रोजी होईल. या सर्वात मोठ्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया करणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे. २०२३ च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.