Akash Deep Story  Saam Tv
क्रीडा

Akash Deep Story : ६ महिन्यांच्या आत वडील, भावाला गमावलं! ३ वर्ष क्रिकेटपासून दूर, आकाशची सक्सेस स्टोरी

Inspirational Story: आकाश दीप... मूळचा बिहारचा.. बिहारच्या सासाराममध्ये आकाशचा जन्म झाला.. तेव्हा आकाशचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते

Saam TV News

>> तुषार ओव्हाळ

Akash Deep Inspirational Story

वडलांना पॅरालिसीसचा अटॅक, उपचारादम्यान मृत्यू, मग भावाचंही निधन... अचानकपणे आलेली घरची जबाबदारी.. क्रिकेटपासून ३ वर्ष दूर राहण्याचा कठोर निर्णय आणि अखेर प्रचंड संघर्षानंतर टीम इंडियापर्यंत केलेली यशस्वी वाटचाल... आकाश दीपचा संघर्ष उधाणलेल्या समुद्राच्या लाटांसारखाय... एकामागोमाग एक संकट येत गेली.. पण संकटांवर मात करत आपल्याला हवा तो किनारा.. त्याने गाठलाच... निव्वळ गाठला नाही, तर दिमाखदार प्रवास करत त्यानं आपली नौका किनाऱ्यापर्यंत दिमाखात उभी करुन दाखवली.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आकाश दीप... मूळचा बिहारचा.. बिहारच्या सासाराममध्ये आकाशचा जन्म झाला.. तेव्हा आकाशचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. मध्यमवर्गीय कुटुंब... आकाशसाठी त्यांच्या आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्नही साधंसंच होतं.. मुलानं शिकावं, मोठं होऊन एखादी सरकारी नोकरी मिळवावी, एवढी माफक अपेक्षा त्यांची होती.. पण आकाश नावाप्रमाणेच.. त्याची स्वप्न आकाशाएवढी मोठी... लहानपणापासून आकाश क्रिकेट खेळू लागला. त्याचं चांगलं क्रिकेट खेळणं त्याच्या वडिलांना धास्तावणारं होतं. वडील टेन्शनमध्ये.. शेजाऱ्यापाजाऱ्यांचं समजू शकतो.. पण खुद्द आकाशच्या बाबांनाही त्यांचं क्रिकेटप्रेम आवडलेलं नव्हतं... क्रिकेटच्या नादामुळे मुलगा हातचा जायचा.. नसत्या नादी लागायचा.. वाया जायचा.. अशी भीती त्यांना सतावत होती... आकाशचं क्रिकेटवेड इतकं होतं.. की शेजाऱ्यांनीही आपल्या मुलांना आकाशसोबत बोलायला देणंही टाळलं होतं.

क्रिकेटला होणारा विरोध...वडिलांचा रोष.. ज्या क्रिकेटवर आकाशचं जीवापाड प्रेम होतं, त्याच क्रिकेटपासून त्याला दूर ठेवणं... आकाशसाठी असह्य होतं.. हे सगळं होत असतानाच.. आकाशने घर सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. घर सोडलं.. आणि त्यानं क्रिकेटमध्ये स्वतःचं करिअर करण्याचा पण केला. पण बिहारमध्ये राहून हे करणं शक्य नव्हतं. कारण बिहार क्रिकेट असोसिएशन सस्पेंड झालं होतं. त्यामुळे आकाशने पश्चिम बंगाल गाठलं.

आईवडीलापासून दूर आलेल्या आकाशच्या मदतीला त्याचा काका धावून आळा. काकाने त्याला मदत केली. बंगालच्या दुर्गपूरमध्ये काकाच्या मदतीने तो क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत होता...आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पूर्ण मन लावून मेहनत करु लागला होता. क्रिकेट एके क्रिकेट असा प्रवास करण्याचं त्यानं मनोमन ठरवून टाकलं, पण या प्रवासात दोन मोठ्या संकटांनी आकाशची परीक्षा बघितली. पहिलं संकट वडिलांच्या रुपाने आलं, तर दुसरं भावाच्या....

एकीकडे आकाश बंगालमध्ये राहून क्रिकेटमध्ये नशीब आजमावत होता. त्याचवेळी बंगालपासून जवळपास ४०० किलोमीटर दूर बिहारमध्ये त्याच्या वडीलांना पॅरेलिसिसचा झटका आला.. आकाशसह त्याचं संपूर्ण कुटुंब या घटनेनं हादरुन गेलं. वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. आणि एक दुःखाचा डोंगरच आकाशच्या कुटुंबीयांवर कोसळला. वडील गेल्याची जखम भळभळत असतानाच आकाशला आणखी एक मोठा धक्का बसला. सहा महिन्याच्या आतच आकाशच्या मोठ्या भावाचंही निधन झालं.. सहा महिन्याच्या अंतरात घरातले दोन कर्ते पुरुष गमावणं काय असतं? याची कल्पना करणंही अंगवार काटा आणणारं होतं...

आता ज्या क्रिकेटसाठी आकाशने घर सोडलं, त्याच घरासाठी क्रिकेट सोडावं लागेल, याची कल्पना आकाशला आली होती. जसं घर सोडण्याचा कठीण निर्णय आकाशने घेतला.. तसाच आणखी एक कठीण निर्णय आकाशने घर सावरण्यासाठी पुन्हा घेतला. कुटुंब की करिअर या प्रश्नात आकाशने कुटुंब निवडलं. हा निर्णय सोपा बिलकुल नव्हता.. पण त्यासाठी क्रिकेटला एक दोन महिने नाही.. तर तब्बल तीन वर्ष आकाशने स्वतःपासून दूर ठेवलं. घर सावरण्यासाठी त्याने उचललेलं पाऊल... सोपं निश्चितच नव्हतं. या तीन वर्षात ना त्याने बॉलकडे ढुंकून पाहिलं आणि नाही मैदानाची वाट धरली. या दोन्ही गोष्टी त्याला खुणावत नव्हत्या असं नाही.. पण परिस्थितीने त्याच्यावर आणलेली वेळ... नियतीचा खेळ... या सगळ्यापुढे आकाश हतबल होता.

आई.. दोन बहिणी.. यांच्यासाठी आकाशनं घरची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली.. वडील आणि मोठ्या भावाच्या पश्चात आकाशच घरातला कर्ता पुरुष म्हणून पुढे आला. त्याने आईसह बहिणींनाही दुःखातून सावरलं. जगण्याचं बळ दिलं... घरची हलाखीची परिस्थिती सुधारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पण क्रिकेटचं स्वप्न आकाशला स्वस्थ बसू देत नव्हतं... त्याला क्रिकेट पुन्हा खुणावू लागलं होतं. त्यासाठी तो पुन्हा जोमाने कामाला लागला.

त्याने सराव करायला सुरुवात केली.. पण आव्हानांनी आकाशचा पाठलाग करणं काही सोडलं नाही. प्रॅक्टीस करत असताना आकाशच्या पाठीला दुखापत झाली. आधी वडिलांचा जाणं, मग मोठ्या भावाचा मृत्यू, कुटुंबाला पुन्हा सावरण्याचं आव्हान आणि त्यात क्रिकेटकडे वळल्यानंतर पाठीला झालेली जखम...

आकाशच्या स्वप्नांची परीक्षाच पाहत होती. पण आकाश हार मानणारा नव्हता. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याचं त्याने ठरवून टाकलं होतं. पाठीच्या जखमेने आकाशच्या स्वप्नांच्या आड येण्याचा प्रयत्न केला खरा.. पण तो लढला.. खंबीरपणे त्याने सर्व संकटांना तोंड दिलं. मेहनत केली. प्रामाणिक राहिला. संघर्ष केला.. या संघर्षात राणादेव बोस आणि सौरिशिष लाहिरी यांनी आकाशला मदत केली. क्रिकेटचे धडे गिरवण्यात आकाशला या दोघांनीही मोलाची कामगिरी केली. आकाशने क्रिकेट खेळायला पुन्हा जोमाने सुरुवात केली.

एका मॅचचे आकाशला ६ हजार रुपये मिळायचे.. महिन्याला आकाश कसाबसा २० हजार रुपयांची कमाई करायचा. त्यातलीही थोडी रक्कम स्वतःकडे ठेवून तो सर्व पैसे घरखर्चासाठी पाठवून द्यायचा. मग उजाडलं साल २०१९. याच वर्षी त्याने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रणजी मॅचेस दरम्यान आकाशने चमकदार कामगिरी करुन दाखवली. सिलेक्टर्सला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आकाशचं नाव भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चीलं जाऊ लागलं. नंतर २०२१मध्ये आयपीएलमध्ये आकाशची निवड झाली. आरसीबीने आकाशला आपल्या संघात घेतलं. २०२२मध्ये एशियन गेम्समध्ये आकाश टीम इंडियाकडून खेळला.

आता पैशांची चिंता नव्हती. पण लक्ष्य होतं इंडियन क्रिकेट टीम. त्यासाठी आकाश मेहनत घेत होता. पण सिलेक्शन काही होत नव्हतं. अखेर नोव्हेंबर 2023 मध्ये दीपकचहर इंजर्ड झाला. त्यामुळे आकाशला संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आकाश टीम इंडियात होता. स्व्कॉवमध्ये तर संधी मिळाली, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये आकाशला खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार होती.

अशातच २०२४ साल उजाडलं... फेब्रुवारीत टेस्ट टीमसाठी आकाशची निवड झाली. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड याच्या हस्ते आकाश दीपला इंडियन कॅप बहाल करण्यात आली. ज्यासाठी त्याने मेहनत घेतली, घर सोडलं, वडिलांचा विरोध पत्करुन क्रिकेटसाठी संघर्ष केला, कुटुंबाला सावरण्यासाठी तीन वर्ष क्रिकेटला स्वतःपासून दूर ठेवलं, पाठीची दुखापत, नंतर सातत्यानं आपल्या खेळावर काम करणं... असा सगळा फ्लॅशबॅक आकाशच्या डोळ्यात तरळून गेला.

ज्या साठी आकाशने अट्टाहास केला होता.. ते स्वप्न साकार झाल्यानं आकाशने आपल्या आईचे पाय धरले.. आशीर्वाद घेतला.. आणि एक महत्त्वाचा टप्पा आयुष्यात यशस्वीपणे गाठल्याचं विनम्रपणे आपल्या घरातल्यांना सांगितलं. हा क्षण आपल्याला याच आयुष्यात पाहायला मिळेल, असं आकाशच्या आईला कधी वाटलंही नसेल. आज जर आकाशचे वडील जिवंत असते, तर त्यांना आकाशला केलेल्या विरोधाचं वाईट वाटलं असतं, एवढं नक्की. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत.. आकाश आता टीम इंडियात आलाय. पण खरा प्रवास आता इथून पुढे असणार आहे, याची जाणीव आकाशलाही आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावाचून गत्यंतर नाही. आकाशची क्रिकेटींग कारकीर्दही आकाशासाठी विस्तारत जावो.... याच शुभेच्छा... आणि त्याने केलेल्या खडतर संघर्षालाही कडक सॅल्यूट..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT