Ajinkya Rahane Century: भारताच्या कसोटी संघातील स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. फ्लॉप कामगिरीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दरम्यान आता त्याने इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी करत कमबॅकसाठी पुन्हा एकदा भारतीय संघाची दारं ठोकली आहे. रहाणे सध्या इंग्लंडमध्ये असून काउंटी क्रिकेट खेळतोय.
या स्पर्धेतील डिव्हीजन २ च्या सामन्यात रहाणेने शतक झळकावलं आहे. या सामन्यात त्याने १०२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाची धावसंख्या ३०० पार पोहोचवली.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत ग्लेमोर्गन आणि लेस्टेशर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात लेस्टेशरकडून खेळत असलेला, रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला. यादरम्यान त्याने १ षटकार आणि १३ चौकार मारले. हे शतक झळकावताच अजिंक्य रहाणे कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजिंक्य रहाणे भारतीय संघातून बाहेर पडून जवळजवळ वर्ष होऊन गेला आहे. जुलै २०२३ मध्ये तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याने भारतीय कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
मात्र त्याला काही संघात स्थान मिळालं नाही. येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान अजिंक्य रहाणे या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. आता निवडसमिती त्याला कमबॅक करण्याची संधी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाचं नेतृत्वही करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण ८५ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ३८.५ च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतकं आणि २६ अर्धशतकं झळकावली आहेत .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.