Cyclone Dana Alert News : बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने २४ ऑक्टोबरच्या रात्री चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, या दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बंगाल सरकारने २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील नऊ जिल्ह्यांतील सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली.
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, ओडिशामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रपतींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ओडीआरएएफची १७ पथके तैनात करण्यात आली आहेत. पर्यटकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क आहे. त्याचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी सज्ज आहे. आम्ही कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या नऊ जिल्ह्यांमधील शाळा आणि कॉलेज बुधवारपासून शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे बॅनर्जी म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिक्षण विभागाने तातडीने यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात नऊ जिल्ह्यांचा उल्लेख आहे. त्यात उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्ण आणि पश्चिम मेदिनीपूर, झाडग्राम,बांकुडा, हुगली, हावडा, कोलकाता यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत सर्व शाळा, कॉलेज २३ ते २६ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील.
दाना चक्रीवादळामुळे दक्षिण बंगालच्या काही जिल्ह्यांत २३ ते २५ ऑक्टोबर या काळात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य आणि जिल्हास्तरावर एकीकृत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. ते २४ तास कार्यरत असणार आहेत.
मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी समुद्रात मासेमारीसाठी बंदी असणार आहे. किनारी भागात सूचना देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.