Pritam Singh Uttarakhand latest news : उत्तराखंडमध्ये मुलींना पक्षात सामील करून घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रीतम सिंह यांच्या दोन भावांवर (चमन सिंह आणि राजपाल सिंह) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित लाइनमनने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या दोन्ही मुलींना काँग्रेसमध्ये आणण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना फोनवर दमदाटी केली होती. प्रकरण वाढल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून बातचीत केली. त्यानंतर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, तर आरोपींनी हा ऑडिओ एडिटेड असल्याचा दावा केला आहे.
एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये लाइनमन असलेल्या बालक राम यांचा अपमान केल्याप्रकरणी आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार प्रीतम सिंग यांचे भाऊ, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष चमन सिंग आणि माजी ब्लॉक प्रमुख राजपाल सिंग यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीत नेमकं काय?
बालक राम हे एनर्जी कॉर्पोरेशनच्या त्युनी सबस्टेशनमध्ये लाइनमन म्हणून काम करतात. त्यांनी डेहराडूनच्या एसएसपींना एक तक्रारीत आमदारांच्या भावांवर गंभीर आरोप केले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी चमन सिंग आणि राजपाल सिंग यांनी त्यांना बोलावून त्यांच्या दोन मुलींना काँग्रेसमध्ये दाखल करण्यासाठी दबाव टाकला. नकार दिल्यावर शिवीगाळ करण्यात आली आणि गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. शिवीगाळ आणि धमकी दिल्याबद्दल चमन सिंग आणि राजपाल यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
बालकराम आणि त्यांच्या मुलींवर काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंग गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या ऑडिओमधील आवाज काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष प्रीतम सिंग यांचे भाऊ माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष चमन सिंग आणि राजपाल सिंग यांचा असल्याचे म्हटले जात आहे. ही ऑडिओ रेकॉर्डिंग एक राजकीय मुद्दाही बनली आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वादग्रस्त ऑडिओची गंभीर दखल घेतली आणि एसएसपींना कारवाई करण्याचे निर्देश दिले. शनिवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी पीडित बालकराम आणि त्यांची मुलगी दीक्षा यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदत व संरक्षणाचे आश्वासन दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी चौकशीसाठी फोन केल्यानंतर दीक्षाने संपूर्ण घटना सांगितली. तिने सांगितले की, फोन करणारे इतक्या अपमानास्पद भाषेत बोलत होते की कुटुंबाला तिथे बसणे कठीण झाले. कुटुंबातील महिलांना तेथून निघून जावे लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.