Sanjay Raut feels dizzy during Delhi protest : राजधानी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांचा आक्रमक मोर्चा निघाला आहे. इंडिया (INDIA) आघाडीच्या खासदारांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा अडवण्यात आला असून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनादरम्यान कडक उन्हाचा त्रास झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अचानक भोवळ आली.
विविध मुद्द्यांवरून इंडिया आघाडीचे सर्व खासदार सरकारविरोधात आक्रमक झाले असून दिल्लीत रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करत आहेत. या आंदोलनादरम्यान वातावरण अत्यंत तापले होते. त्यातच खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली. उन्हाचा त्रास झाल्यामुळे त्यांना चक्कर आली असता, उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सावरले आणि सावलीत नेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
आज भ्रष्ट निवडणूक आयुक्त द्यानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत निघालेल्या विरोधकांच्या मोर्चात सहभागी झालो, संसद भवन ते निर्वाचन भवन मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले. शिवसेना खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई मोर्चात सहभागी झाले. परिवर्तन अटळ आहे! हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले! -संजय राऊत
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी आकाशवाणी भवनाजवळ अडवला आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळात दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुंबईतील काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या झटापटीत वर्षा गायकवाड आणि खासदार बर्वे हे जखमी झाले आहेत.
आंदोलनाची तीव्रता पाहता दिल्ली पोलिसांची बस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी (DCP) तातडीने आकाशवाणी भवनात पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकारी आणि राहुल गांधी यांच्यात घटनास्थळीच चर्चा झाली. सध्या दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.