पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्ली विमानतळावर सुमारे तीन तास थांबवण्यात आल्याचा आरोप.
‘आप’चे सरचिटणीस बलतेज पन्नू यांनी केले आरोप
मान यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा पन्नू यांचा दावा
पंजाबमधील कृषी व खाद्य उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पॅरिस दौरा केल्याचे ‘आप’चे म्हणणे
पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पॅरिसहून भारतात परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर जवळपास ३ तास थांबवण्यात आल्याचा आरोप आप पक्षाकडून करण्यात आला. या घटनेवरून पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला असून, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
पंजाब ‘आप’चे सरचिटणीस बलतेज पन्नू यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, भगवंत मान हे पंजाबच्या कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पॅरिसला गेले होते. तिकडच्या एका मोठ्या खाद्य महोत्सवात पंजाबमधील राजमा, छोले आणि इतर काही पदार्थांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्याचा त्यांचा उद्देश होता.
पन्नू यांच्या म्हणण्यानुसार, परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मान यांना दिल्ली विमानतळावर बराच वेळ थांबवण्यात आले. सुरुवातीला त्यांच्या सामानाची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे तीन तासांनी त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. याचदरम्यान, त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा दावाही पन्नू यांनी केला.
भगवंत मान यांचा पॅरिस दौरा न्यायालयाच्या आदेशानुसार झाला होता, असे ‘आप’च्या नेत्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने एनओसी देण्यास नकार दिल्यानंतर या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्देशांनंतरही मुख्यमंत्र्यांना अपेक्षित सन्मान आणि शासकीय प्रोटोकॉल मिळाला नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे. दरम्यान, दिल्ली ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. पंजाबच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
पंजाबच्या विकासासाठी आणि राज्यातील शेतकरी व उत्पादकांच्या हितासाठी परदेश दौरे महत्त्वाचे असल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे. केंद्र सरकार पंजाबच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे केंद्र आणि पंजाब सरकारमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.