दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून आंदोलन
आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण झाल्याचा आरोप
पोलिस कॉन्स्टेबल अंकित कसाना यांचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
सुमारे ४० ते ५० आंदोलकांनी घेरून मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला
आंदोलकांनी शिवीगाळ केली, वर्दी फाडली आणि हाताला चावा घेतल्याचा आरोप त्यांनी केला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनादरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलचा रडत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या पोलिसाने आंदोलनादरम्यान त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. आंदोलनकर्त्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे आणि त्यामुळे जखमी झाल्याचे हा पोलिस रडत रडत व्हिडीओमध्ये सांगत आहे.
अंकित कसाना असं मराहाण झालेल्या या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्यांनी आरोप केला की, बुधवारी काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान मला मारहाण झाली त्यामुळे मी गंभीर जखमी झालो. त्यांनी असाही आरोप केला की, आंदोलनकर्त्याने त्याच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे हाताला जखमा झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पोलिसाने रडत रडत आपले दु:ख व्यक्त केले. त्यांनी असे सांगितले की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पोलिसांना कॉल केला जातो. जर आमच्यासोबत असे होत असेल तर कोण आपल्या मुलांना पोलिसाची नोकरी करण्यासाठी पाठवेल.
या पोलिसाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मारहाण झाल्यानंतरचा आहे. यामध्ये नेमकं काय घडलं होतं हे सांगत अंकित कसाना यांनी आरोप केला की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्या सर्वांना पोलिस पुढे घेऊन जात होते. त्यावेळी काही आंदोलनकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ४० ते ५० जणांनी मला घेरलं आणि मारहाण केली. आंदोलकांनी माझ्या हाताला चावा घेत माझी वर्दी देखील फाडली.
त्या पोलिस कॉन्स्टेबलने असाही दावा केला की, आंदोलनादरम्यान जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते तेव्हा त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. कर्तव्यावर असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस अधिकाऱ्यांची असते परंतु कधीकधी आंदोलकांच्या जमावाकडून त्यांनाच लक्ष्य केले जाते हे दुर्दैव आहे.
या मारहाणीनंतर पोलिसाला उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर या पोलिसाने दिल्ली पोलिस आणि सरकारकडे पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर मी खूप घाबरलो होतो. मला माझी आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची जास्त चिंता वाटत होती, असे या पोलिसाने सांगितले. जेव्हा या पोलिसाला मारहाण केली जात होती तेव्हा डीसीपी सचिन शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची आंदोलकांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी रडणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला धीर देत त्यांनी त्याला शांत केले आणि कारमध्ये बसवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.