पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.
यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः या चित्त्यांचे फोटो देखील काढले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज अनेक दशकांनंतर देशात चित्ता परतला आहे. यासाठी आम्ही नामिबिया सरकारचे आभार मानतो. ज्यांच्यामुळे भारतात चित्ता आले. हे दुर्दैव आहे की आपण 1952 मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले होते, परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्याचबरोबर लोकांना चित्ता पाहण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे आगमन झाले आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण झालं की आपले भविष्यही सुरक्षित असतं हे खरं आहे. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ता पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल", असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, हे असे काम आहे ज्याला कोणीही महत्त्व देत नाही. आम्ही त्यामागे पूर्ण ताकद लावली, पूर्ण नियोजन केले, शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि तिथले तज्ज्ञही भारतात आले. चित्त्यांसाठी सर्वात योग्य क्षेत्रासाठी देशभर सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यानाची निवड करण्यात आली. आज आपल्या मेहनतीचे फळ आपल्यासमोर आहे.
विशेष विमानाने नामिबियातून हे चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.
तसेच या चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.