DELHI-VARANASI IN 4 HOURS, MUMBAI-PUNE IN 48 MINUTES: 7 NEW HIGH-SPEED RAIL CORRIDORS saam tv
देश विदेश

मुंबई-पुणे फक्त ४८ मिनिटांत, दिल्ली-वाराणसी अवघ्या ४ तासांत...; १६ लाख कोटी...भारतीय रेल्वेनं बघितलेलं 'बुलेट' स्वप्न सत्यात उतरणार

Delhi To Varanasi High Speed Train Travel Time: दिल्ली-वाराणसी प्रवास 4 तासांपेक्षा कमी आणि मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटांत होणार असून 7 नव्या हायस्पीड रेल्वे मार्गांची घोषणा करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

दिल्लीहून वाराणसीला रेल्वेने जाण्यासाठी चार तासांपेक्षा कमी वेळ लागला किंवा मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण झाला,तर? कदाचित असा विचार स्वप्नात येईल. मात्र येत्या काही वर्षांत हे स्वप्न खरे होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेने देशात सात नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सात नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली होती. या मार्गांना ‘ग्रोथ कनेक्टर्स’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.

दरम्यान भारतीय रेल्वेकडून वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासातही मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. अधिक वेगवान प्रवासासोबतच जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सेवा देण्यावर भर दिला जात आहे.

कोणते आहेत 7 नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर?

1. दिल्ली ते वाराणसी

दिल्ली आणि उत्तर प्रदेशाला जोडणाऱ्या या प्रस्तावित कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ सुमारे 3 तास 50 मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत आर्थिक विकासाला वेग मिळण्याची शक्यता आहे.

2. मुंबई ते पुणे

पश्चिम भारतातील महत्त्वाचा मानला जाणारा हा कॉरिडॉर मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणार आहे. या मार्गावर प्रवासाचा कालावधी अवघ्या 48 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. मुंबई-पुणे मार्गावरील वाढती प्रवासी आणि मालवाहतूक लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

3. पुणे ते हैदराबाद

महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणाऱ्या या मार्गावर प्रवासाचा वेळ सुमारे 1 तास 55 मिनिटे राहण्याची अपेक्षा आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतातील हायस्पीड रेल्वे नेटवर्कला हा मार्ग जोडणार असून, दोन्ही राज्यांमधील प्रवास आणि व्यापार अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.

4. हैदराबाद ते बेंगळुरू

दक्षिण भारतातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्कचा हा महत्त्वाचा भाग आहे. या मार्गामुळे हैदराबाद ते बेंगळुरू प्रवासाचा वेळ सुमारे 2 तासांवर येऊ शकतो. कर्नाटक आणि तेलंगणातील आयटी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना या मार्गाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

5. हैदराबाद ते चेन्नई

हैदराबाद आणि चेन्नई या दोन महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या या मार्गावर प्रवासाचा कालावधी सुमारे 2 तास 55 मिनिटे असण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या भागांमधील व्यावसायिक आणि प्रवासी संपर्काला यामुळे चालना मिळू शकते.

6. चेन्नई ते बेंगळुरू

चेन्नई-बेंगळुरू हायस्पीड रेल्वे मार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 1 तास 13 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

7. वाराणसी ते सिलीगुडी

वाराणसी ते सिलीगुडी हा प्रवास पाटणामार्गे केल्यास सुमारे 2 तास 55 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील धार्मिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय केंद्रांना हा मार्ग जोडणार आहे. पूर्व भारतातील पहिली हायस्पीड रेल्वे सेवा म्हणूनही या मार्गाकडे पाहिले जात आहे.

भारताची पहिली बुलेट ट्रेन

भारतामध्ये अहमदाबाद ते मुंबईदरम्यान देशातील पहिला बुलेट ट्रेन कॉरिडॉर विकसित केला जात आहे. या प्रकल्पाचा काही भाग येत्या काही वर्षांत प्रवाशांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे. बुलेट ट्रेनचा वेग साधारणपणे 300 किमी प्रतितास असतो. तर हायस्पीड रेल्वेमध्ये साधारण 220 ते 250 किमी प्रतितास वेगाच्या सेवांचाही समावेश केला जातो. मुंबई ते अहमदाबाद संपूर्ण बुलेट ट्रेन मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार असली, तरी गुजरातमधील या मार्गाचा काही भाग ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच भारतात पहिल्यांदाच देशात बुलेट ट्रेन तयार करण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे. BEML कडून दोन हायस्पीड ट्रेनची निर्मिती केली जात असून, या ट्रेन 2027 च्या पहिल्या सहा महिन्यात चाचणीसाठी तयार होण्याची अपेक्षा आहे. या सात नव्या हायस्पीड कॉरिडॉरमुळे देशातील प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यासोबतच व्यापार, पर्यटन, रोजगार आणि दोन राज्यातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

GST Council Meeting: अटकेची तरतूद रद्द! रिफंड, क्रेडिट लिमिटसह GST मध्ये १० मोठे बदल

Meta Update: फेसबुकवर आणि इंन्स्टाग्रामवर आता असा कंटेंट दिसणार नाही... मेटानं केल्या उपाययोजना

Mumbai Ranji team: सिद्धेश लाडच्या नेतृत्वात मुंबईचं रणजी मिशन सुरू; 43व्या विजेतेपदासाठी टीम मैदानात उतरणार

Hingoli News: दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक! सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या शाखेला ठोकलं टाळं, अधिकाऱ्यांना ठेवलं कोंडून, कारण काय?

SCROLL FOR NEXT