हिमाचल प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. माजी मंत्री आणि रामपूरचे माजी आमदार सिंघी राम यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.
भाजपमध्ये अस्वस्थ वाटत असल्याचे कारण देत रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. सिंघी राम सध्या कोणत्याही इतर राजकीय पक्षात जाणार नाहीत, असे म्हटले जातेय. पण ते काँग्रेस पक्षात परत येण्याच्या चर्चांना जोर चढला आहे.
रामपूरचे आमदार नंदलाल यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. सिंघी राम यांचा राजीनामा हा या चर्चेचाच एक भाग मानला जात आहे. सिंघी राम यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षासोबत चार दशकांहून अधिक काळ चालली. त्यांनी १९८४ ते २००७ या काळात रामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले.
१९८४ ते २००७ या काळात त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रिपदांसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. रामपूर आणि राज्य राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख आहे. सिंघी राम यांचा काँग्रेसशी संबंध त्यांच्या विद्यार्थीदशेतील राजकारणाच्या दिवसांपासूनचा आहे.
सिंघी राम यांनी १९७५ मध्ये एनएसयूआयच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ते युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि दीर्घकाळ काँग्रेस संघटनेशी संबंधित राहिले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सिंघी राम यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याचे स्थानिक माध्यामांनी सांगितले.
सिंघी राम जर काँग्रेस पक्षात परतले, तर त्याचा परिणाम रामपूर विधानसभा मतदारसंघावर तसेच शिमला जिल्ह्याच्या राजकारणावर होऊ शकतो. सिंघी राम यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. आता सर्वांचे लक्ष त्यांच्या आगामी निर्णयाकडे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.