उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळपासूनच बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. या छाप्यांमध्ये पन्नासहून अधिक आयकर अधिकारी सहभागी आहेत आणि ते लखनऊ, बलिया, सोनभद्र, तसेच प्रयागराज, कौशांबी आणि वाराणसी येथे पोहोचले आहेत. छाप्यांमध्ये आयकर पथकाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत, यामध्ये मालमत्ता, बँक खाती, लॉकर्स आणि कंपन्यांचा समावेश आहे.
आयकर विभागाच्या अधिकारी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित रेकॉर्ड, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त करत आहेत आणि त्यांची घटनास्थळी तपासणी करत आहेत. कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. मात्र आयकर विभागाने अजूनतरी या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
खरं तर, उमाशंकर सिंग हे एजन्सीच्या रडारवर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही त्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध दक्षता चौकशी देखील सुरू आहे. उमाशंकर सिंग यांच्यावर बेकायदेशीर खाणकामाद्वारे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आणि सरकारचा महसूल बुडवल्याचा आरोप आहे. तरीही सरकारची त्यांच्यावर मेहरबानी कायम राहिली आणि त्यांच्या कंपन्यांना प्रत्येक सरकारच्या काळात मोठी कंत्राटे मिळत राहिली. मायावती सरकारच्या काळात ते फुलटाईम कंत्राटदार होते.
जेव्हा ते बसपाचे आमदार झाले, तेव्हा मायावतींचे सरकार गेले, परंतु समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळातही, त्यांची कंपनी छात्र शक्तीची ताकद वाढत राहिली आणि तिला असंख्य हजारो कोट्यावधीचे कंत्राटे मिळत होती. समाजवादी पक्षाचे सरकार पडले आणि योगी सरकार आले. या सरकारमध्येही उमाशंकर यांनी संबंध प्रस्थापित करण्यात यश मिळवले, व्यवसाय चालू राहिला आणि खाणकाम जोरदार भरभराट सुरू राहिली.
२०२५ च्या कॅगच्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की उमाशंकर सिंग यांच्या कंपनीने, सीएस इन्फ्राकंस्ट्रक्शनने २०२४ मध्ये ३३,६०३ घनमीटर बेकायदेशीरपणे उत्खनन केले, ज्यामुळे सरकारला ६० कोटींपेक्षा जास्त महसूल तोटा झाला. तरी अजूनतरी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांच्या कंपन्यांचे अजूनही सरकारी कंत्राटांवर वर्चस्व आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात केवळ 50 किंवा 60 कोटी रुपयांचा कर चुकवला नाही तर शेकडो कोटींची कर बुडवला आहे. म्हणूनच आयकर पथके मागच्या 30 तासांपासून काही ठिकाणी तळ ठोकून आहेत. या कारवाईमुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीवर याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.