Weather Update News : देशभरात हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १२ नोव्हेंबरसाठी अनेक राज्यांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. नव्या पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे पर्वतीय क्षेत्रांसह दक्षिण व पूर्व राज्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र कोरडे हवामान राहू शकते. पहाटेच्या वेळी राज्यात हवामानात गारवा राहील.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तराखंड आणि पंजाबच्या काही भागांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बदलामुळे तापमानात मोठी घट होणार आहे. महाराष्ट्रात सध्या हवामान प्रामुख्याने कोरडे असले तरी, उत्तर भारतातील या बदलांमुळे येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. नोव्हेंबरच्या मध्यात हिवाळ्याची जाणीव होऊ लागली आहे.
ईशान्य आणि दक्षिण भारतातही पावसाचे सावट
फक्त उत्तर भारतच नव्हे, तर ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या राज्यांतही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मैदानी भागातही काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात.
दिल्लीत प्रदूषणाची चिंता कायम
दुसरीकडे, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवामानाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे दिल्लीची हवा पुन्हा एकदा 'अतिसंवेदनशील' श्रेणीत पोहोचली आहे. बुधवारचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३१३ इतका नोंदवला गेला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेताना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.