हुबळी: कर्नाटकातील प्रख्यात वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली होती. हुबळीतील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
हॉटेलच्या लॉबीमध्ये दोघे हल्लेखोर चंद्रशेखर गुरुजींच्या येण्याची वाट बघत होते. गुरूजी आल्यानंतर एक हल्लेखोर त्यांच्या पाया पडला. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्या दोघांनी गुरूजींवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते. (Chandrashekhar Guruji case incident caught on CCTV camera)
वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी हत्याकांडाच्या काही तासांनंतर दोन्ही आरोपी मंजुनाथ मारेवाड आणि महांतेश याला रामदुर्ग येथून अटक केली.
अटक केलेल्या हल्लेखोरांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रशेखर गुरूजी यांची हत्या का केली, याचे कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी (Police) सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरूजी यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये कुणीतरी येण्यास सांगितले होते. लॉबीत आल्यानंतर तेथे आधीपासूनच वाट बघत बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी विजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी गुरुजींच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली, हे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.