अखिलेश यादव विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट
निवडणूक न लढवताच मुख्यमंत्री होण्याचा विश्वास व्यक्त केला
वाराणसी दौऱ्यात योगी सरकारवर टीका
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०२७ मधील विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, निवडणूक न लढवताच थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
मंगळवारी अखिलेश यादव वाराणसी दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना काशीतील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय सांगितला. ते म्हणाले की, आपण निवडणूक न लढवताही मुख्यमंत्री होतो. यापूर्वीही आपण लोकसभेचे खासदार असताना मुख्यमंत्री झालो होतो. त्यामुळे यावेळीही थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ, असे त्यांनी सांगितले. यानंतर अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली. विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रशासनाचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादामुळे पक्षाला यश मिळाल्याचे ते म्हणाले.
भाजप आगामी निवडणुकीत आपल्या सुमारे २०० आमदारांची तिकिटे कापू शकतो, असा दावाही त्यांनी केला. मणिकर्णिका घाटाच्या ऐतिहासिक वारशाबाबतही त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. भाजप सरकारच्या काळात वाराणसीच्या विकासाऐवजी शहराच्या परंपरेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास वाराणसीमध्ये मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
दरम्यान, धार्मिक विषयांवरूनही अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. काही लोकांच्या वक्तव्यांमुळे सनातन धर्म मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे ते म्हणाले. एकूणच, अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यामुळे २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.