मौरचे ‘आप’ आमदार सुखवीर मैसरखाना यांची आम आदमी पक्षातून हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाया, खोट्या अफवा आणि पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा मांडल्यानंतर मैसरखाना यांना शिक्षा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आपल्या विद्यमान आमदाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. मौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुखवीर मैसरखाना यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग, खोट्या अफवा पसरवणे आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मैसरखाना यांनी आपल्या मतदारसंघातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित करत थेट आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मैसरखाना यांनी सोशल मीडियावर सुमारे 14 मिनिटांचा लाइव्ह व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा मांडला. यावेळी ते भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी आपण अनेकदा मुख्यमंत्री भगवंत मान, माजी दिल्ली उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केली होती, मात्र अद्याप या समस्येवर तोडगा निघालेला नाही, असा दावा त्यांनी केला.
आपल्या मुलांच्या शिक्षणाचा दाखला देताना मैसरखाना यांनी सांगितलं की, शाळेत काय शिकवलं, असं मुलांना विचारलं असता शिक्षकांची कमतरता असल्याचं ते सांगतात. शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनही शिक्षकांची पदं भरण्याची मागणी होत असल्याचं त्यांनी म्हटलं. “तिकीट कापायचं असेल तर कापा, पण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित करत राहणार,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती. बुर्ज सहीमा गावातील सरकारी शाळेच्या अपग्रेडेशनचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, संबंधित शाळेत आधीच 25 शिक्षक कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांनी या प्रकरणावरून पंजाब सरकारवर निशाणा साधला. आपल्याच आमदाराचा व्हिडिओ सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवरील दाव्यांवर प्रश्न उपस्थित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं. सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षक पदं तातडीने भरण्याची मागणीही त्यांनी केली. आता शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या आमदारावरच पक्षाने कारवाई केल्याने पंजाबच्या राजकारणात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.