नारायण राणे Saam Tv
देश विदेश

BJP टीम नड्डा -२ मध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान, राणेंचे नाव वगळले

आशिष शेलार, चित्रा वाघ व सुधीर मनुगंटीवार यांना विशेष आमंत्रित म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थानही देण्यात आलेले नाही

साम टिव्ही

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर केली. जास्तीत जास्त नव्या पक्षनेत्यांना राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून ‘टीम नड्डा‘ मध्ये काम करण्याची संधी देण्यावर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा भर असल्याचे यादीवरून दिसते.

३०९ जणांच्या या जम्बो टीम नड्डा-२ मध्ये राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा (मुंबई) तसेच विनोद तावडे, पंकजा मुंडे, डॉ. हीना गावित यांच्याबरोबरच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, सुनील देवधर, अल्पसंख्यांक आघाडीचे जमाल सिद्दीकी यांंची नावे या यादीत आहेत.

आशिष शेलार, चित्रा वाघ व सुधीर मनुगंटीवार यांना विशेष आमंत्रित म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थानही देण्यात आलेले नाही.

या कार्यकारिणीत ८० सदस्य, ५० विशेष आमंत्रित व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आदी १७९ कायम स्वरूपी आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांच्याशिवाय टीम मोदीमधील निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, अमेठीच्या खासदार स्मृती इराणी, जितेंद्र सिंह, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, सु. जयशंकर, भूपेंद्र यादव, गिरीराज सिंह, नरेंद्र तोमर आदी बहुतेक मंत्र्यांची वर्णी यादीत लागलेली आहे. योगी आदित्यनाथ व सिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपचे सध्याचे १२ मुख्यमंत्री व ८ उपमुख्यमंत्रीही राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत.

भाजप नेतृत्वाने वानप्रस्थाश्रमात पाठविलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, बी एस येदियुरप्पा यांची नावे कायम ठेवली आहेत. मंत्रिपद नुकतेच काढून घेतलेले रविशंकर प्रसाद व डॉ. हर्षवर्धन आदींची नावे नव्या कार्यकारिणीत आहेत. मात्र रामजन्मभूमी आंदोलनातील फायरब्रॅंड नेते विनय कटियार यांचा पत्ता कट झाला आहे. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आगेमागे होण्याची शक्यता आहे.

रहाटकरांबाबत नजरचूक, राणेंचे काय ?
भाजप महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांचेही नाव भाजपच्या अधिकृत यादीत नाही. मागील कार्यकारिणीत त्या राष्ट्रीय सचिव होत्या व सध्या त्या दीव दमणमध्ये भाजपच्या लोकसभा पोटनिवडणूक प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे नाव नव्या कार्यकारिणीत नसल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नड्डा यांनी आज दुपारी रहाटकर यांच्याशी चर्चा केली व त्यांचे कार्यकारिणीतील स्थान अबाधित असल्याची ग्वाही दिली.

अधिकृत यादीत ‘नजरचुकीने‘ रहाटकर यांचा नामोल्लेख राहिल्याचे भाजपमधून सांगण्यात आले. तब्बल ३०९ जणांच्या यादीत सत्तारूढ पक्षाकडून झालेल्या अन्य राज्यातील अशाच ‘नजरचुकां‘चा तपशील तातडीने समजलेला नाही. राणे हे केवळ केंद्रीय मंत्री नाहीत तर ते महाराष्ट्रासारख्या राज्याचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. ते भाजपमध्ये नवीन म्हणून ‘राष्ट्रीय टीम' मधे त्यांचे नाव नाही म्हणावे तर ज्योतिरादित्य सिंदे, अश्विनी वैष्णव, मिथून चक्रवर्ती, दिनेश त्रिवेदी यासारख्या इतर पक्षांतून भाजपवासी झालेल्या अनेकांना या यादीत स्थान मिळाले आहे. आता राणे यांच्याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर त्यांचे नावही नंतर यादीत हळूच घालण्यात येईल अशी चर्चा आहे.

महाराष्ट्र पुसटसाच !
या टीममध्ये उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल आदी राज्यांचे अस्तित्व ठसठशीतपणे जाणवते. मात्र गडकरी, जावडेकर, फडणवीस, चंद्रकांत दाद पाटील, सहस्त्रबुध्दे व गोयल वगळता राज्यातील ठळक नावे अभावानेच दिसतात. अनेक विभाग असे आहेत की ज्यात मराठी नावे नाहीतच. १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ७ महामंत्री, युवा, महिला, ओबीसी, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती या आघाड्यांची अध्यक्षपद यात महाराष्टारीतल एकही नाव नाही.

तब्बल २६ राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये बिहार विधानपरिषदेचे सदस्य व मंत्री असलेले शहानवाज हुसेन व संजय मयूख, कॉंग्रेसमधून आलेले टॉम वढक्कन आदींची नावे आहेत. यात राज्यातून केवळ हीना गावित या एकट्याच आहेत. मात्र मागील टीम नड्डा मध्ये समावेश झाल्यापासून त्यांना दिल्लीत स्वतंत्ररीत्या पत्रकार परिषद घेण्याची संधी अद्याप मिळालेली नाही. भाजपमधील संघाचे प्रतिनिधी म्हणजे संघटनमंत्री. महाराष्ट्रातील संघटनमंत्री कोण हे यादीवरून समजतच नाही.

महाराष्ट्रातील सदस्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुध्दे, चित्रा वाघ (कार्यकारिणी सदस्य), देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर (विधिमंडळ पक्षनेते) चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष), विनोद तावडे, सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, लड्डाराम नागवाणी (विशेष आमंत्रित), हीना गावित (प्रवक्त्या), जमाल सिददीकी (अल्पसंख्यांक आघाडी), सी टी रवी, जयभानसिंग पवैय्या व ओमप्रकाश धुर्वे (प्रबारी, सहप्रभारी)

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

SCROLL FOR NEXT